यामाहाने मोटरसायकलच्या किंमती १.१० लाख रुपयांपर्यंत उतरवल्या; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:53 IST2025-02-04T11:53:04+5:302025-02-04T11:53:44+5:30
Yamaha Price Cut: एकेकाळी यामाहाच्या एफझेड सारख्या मोटरसायकलची तरुणवर्गात क्रेझ होती.

यामाहाने मोटरसायकलच्या किंमती १.१० लाख रुपयांपर्यंत उतरवल्या; कारण काय?
ईलेक्ट्रीक गाड्या आल्यापासून फारशा प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या यामाहाने अचानक त्यांच्या मोटरसायकलच्या किंमती तब्बल १.१० लाख रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. एकेकाळी यामाहाच्या एफझेड सारख्या मोटरसायकलची तरुणवर्गात क्रेझ होती. आजही आहे, परंतू सध्या पेट्रोलच्या किंमती वाढल्याने हा वर्ग आता खिशाला परवडणाऱ्या पर्यायांकडे वळू लागला आहे. यामाहाने या मोटरसायकलच्या किंमती का कमी केल्या, काही खास कारण यामागे आहे का ते जाणून घेऊया.
इंडिया यामाहा मोटरने वाढत्या वाहनांच्या किंमती लक्षात घेऊन १ फेब्रुवारी २०२५ पासून यामाहा आर३ आणि एमटी-०३ या मोटरसायकलच्या किंमती १.१० लाख रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. सिग्नेचर रेसिंग डीएनएसाठी या मोटरसायकल ओळखल्या जातात. यामाहा जागतिक स्तरावर R3 चा १० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने या किंमती कमी करण्यात आल्या आहेत.
यामाहाच्या या मोटरसायकलच्या किंमतीही तशा लाखांच्या घरातच आहेत. या मोठ्या कपातीनंतर यामाहा R3 ची नवीन किंमत 3,59,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) झाली आहे. तर MT-03 आता 3,49,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) किमतीत उपलब्ध करण्यात आली आहे.
यामाहा आर ३ मध्ये ३२१ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. या बाईकचे मायलेज २९ किमी प्रति लीटर एवढे आहे. तर ६ स्पीड मॅन्युअल गिअर देण्यात आला आहे. इंधन टाकीची क्षमता १४ लिटर एवढी आहे. तर MT-03 मध्ये देखील ३२१ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. परंतू या बाईकचे मायलेज ३५ किमी प्रति लीटर असल्याचा दावा करण्यात आला आहे. इंधन टाकीची क्षमता १४ लिटर एवढी आहे.