मारुती जिम्नीवर चेतक किंवा आयक्यूब फ्री...! ऑटो कंपन्यांची जबरदस्त ऑफर, पावसाळी सिझन...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 06:48 PM2024-06-24T18:48:09+5:302024-06-24T18:48:24+5:30
टाटाच नाही तर स्कोडा, फोक्सवॅगन, ह्युंदाई, महिंद्रा आदी कंपन्यांनीही डिस्काऊंट जारी केले आहेत. या कंपन्या आघाडीवर असताना आघाडीची मारुती मागे कशी राहील?
पावसाळी सिझन सुरु झाला असून ऑटो कंपन्यांनी ऑफर्सचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. टाटाने त्यांच्या कारवर १ रुपयात इन्शुरन्ससह १ लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट जारी केला आहे. टाटाच नाही तर स्कोडा, फोक्सवॅगन, ह्युंदाई, महिंद्रा आदी कंपन्यांनीही डिस्काऊंट जारी केले आहेत. या कंपन्या आघाडीवर असताना आघाडीची मारुती मागे कशी राहील? मारुतीनेही जबरदस्त डिस्काऊंट जारी केले आहेत.
महिंद्राच्या थारला टक्कर देण्यासाठी आणलेली मारुती जिम्नीचा खप कमालीचा घटला आहे. गाडीच्या मानाने किंमत जरा चढीच ठेवल्याने सुरुवातीला जे प्रेमी होते त्यांनी ही कार घेतली आहे. आता मारुतीला गिऱ्हाईक शोधावे लागत आहे. यामुळे खपतच नसल्याने मारुतीने जिम्नीवर व्हेरिअंटनुसार ५० हजार ते १.५० लाखांपर्यंत डिस्काऊंट जाहीर केला आहे.
हा डिस्काऊंट एवढा आहे की या किंमतीत टीव्हीएस अपाचे किंवा ईलेक्ट्रीकमध्ये बजाज चेतक, आयक्यूब सारख्या दुचाकी घेता येणार आहेत. मारुतीने मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक या दोन्ही व्हेरिअंटवर डिस्काऊंट जारी केला आहे. या वाचलेल्या पैशांत ग्राहक महागडी दुचाकी नक्कीच घेऊ शकणार आहे.
कारवर सर्वाधिक डिस्काऊंट कधी मिळतो?
कार या महाग होत चालल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी ज्या किंमतीत डिझेल कार यायची आता त्या किंमतीत पेट्रोल कार येऊ लागली आहे. डिझेलची कार तर आता १०-११ लाखाच्या पुढेच मिळत आहे. यामुळे ग्राहक पेट्रोल, सीएनजी किंवा ईव्हीकडे वळू लागले आहेत. अशातच डिस्काऊंट हवा असेल तर कधी काय घ्यावी? यासाठी वेळ साधणे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या वाढदिवशीच कार घ्यायचीय, एखाद्या मुहूर्तालाच घ्यायचीय तर मग तुम्ही काहीच करू शकणार नाही. डीलर तुमची गरज ओळखून किंमत ताठ ठेवतो. अशावेळी महिन्याचा शेवटी कार घ्यावी, किंवा जून, जुलै महिना किंवा डिसेंबर, जानेवारी हे महिने कमी किंमतीत तुम्हाला हवी असलेली कार तुम्ही घेऊ शकता.