तुमच्या स्कूटर व मोटारसायकलचे आरसे व्यवस्थित हवेतच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 04:10 PM2017-09-27T16:10:28+5:302017-09-27T16:13:21+5:30

दुचाकी वाहनांवरील आरसे हे अनेकांचे मोडलेले, खराब स्थिती असतात. त्याकडे अनेक चालकांना लक्षही द्यावेसे वाटत नाही. मात्र ही बाब कधी गंभीर अपघातालाही कारणीभूत ठरू शकते.

Your scooter and motorbike should have good mirrors | तुमच्या स्कूटर व मोटारसायकलचे आरसे व्यवस्थित हवेतच

तुमच्या स्कूटर व मोटारसायकलचे आरसे व्यवस्थित हवेतच

Next
ठळक मुद्देदुचाकीला आरसा हा किती महत्त्वाचा आहे, ते लक्षात घ्यायला हवेआरशात मध्ये मध्ये बघून वाहन चालन करण्याची सवय ठेवावी लागतेतुमच्या ड्रायव्हींग कौशल्याचे प्रतिबिंब तुमच्या दुचाकीच्या आरशाद्वारेच पडत असते, हे लक्षात ठेवा

पुणे असो वा मुंबई सध्या दुचाकीस्वारांचे अपघात पाहिले व ऐकले, त्यांच्या अपघाताची छायाचित्रे पाहिली की बऱ्याच बाबी जाणवतात. त्यात एक म्हणजे अनेक दुचाकीस्वारांना जणांना मागून येणाऱ्या वाहनापासून धक्का लागलेला आहे. अपगातामध्ये जसे बेदरकार वेग कारणीभूत असतो, तसाच रस्त्यावर आपल्या मागे वा बाजूने कोण जात आहे, याची जाणीव नसल्याने अपघातांला अनेक जण निमंत्रण देत असतात. अनेक स्कूटर्स वा मोटारसायकल्सचे शहरातील अस्तित्त्व पाहिले म्हणजे केवळ सायकलऐवजी पेट्रोलवर चालणारी दुचाकी चालवीत आहोत, अशा प्रकारे दुचाकीस्वारांचे मत असावे.

आरटीओच्या नियमाप्रमाणे दुचाकीला आरसा हा सक्तीचा आहे, पण अनेकजण आरशाचे अस्तित्त्व केवळ पोलिसांना दाखवण्यापुरते ठेवत असावेत, अशी स्थिती दिसून येते. आरशामध्ये मागून कोणी वाहन ओव्हरटेक करीत आहे का, डाव्या बाजूने वा उजव्या बाजूने आपल्या अगदी जवळून कोणी जात आहे का, याची काळजी घेणे अगदी गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या दुचाकीच्या आरशांची स्थिती योग्य हवी, त्या आरशांची अवस्था चांगली हवी. पण अनेक दुचाकीच्या आरशांची दूरवस्था झालेली असते.

अनेक स्कूटर्सच्या आरशांनी मान टाकलेली असते तर मोटारसायकलींचे आरसे काहींनी काढूनच टाकलेले असतात, किंवा ते काढले गेल्यानंतर पुन्हा नव्याने लावले जात नाहीत. यामुळे रस्त्यांवर ठिकाणी अंदाज न आल्याने दुसऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो, कारण ओव्हरटेक करीत असताना हॉर्न देऊनही आरसा नसलेल्या मोटारसायकलस्वारांनी बाजूला होण्याचे वा काहीशी जागा मागील वाहनाला देण्याचे उदारपण दाखवले नाही, तर वादावादीचे प्रसंगही दिसून येतात. एकंदर आरसा नसला तर काय होते याची जाणीव त्यांना नसते. काहीवेळा आरसे मान टाकलेल्या स्थितीत असतात, त्यामुळे आरशामध्ये मागून काही वाहन येत आहे की नाही याची जाणीव तरी त्यांना कशी होणार?

दुचाकीला आरसा हा किती महत्त्वाचा आहे, ते लक्षात घ्यायला हवे. मागून येणारे चारचाकी वा दुचाकी वाहन, ओव्हरटेक करणारे वाहन, बाजूने जाणाऱ्या अन्य दुचाकी, त्या बाजूने जाणाऱ्या अन्य दुचाकींची स्थिती, नेंमक्या किती जवळ आहेत की योग्य अंतरावर आहेत त्याचा अंदाज येणे. शहरी रस्त्यांवर रांगेचे भान अधिक पाळावे लागते, त्यामुळे तुम्ही रांगेत असणे व त्याचबरोबर मागील वाहन रांगेत आहे की नाही, ते लक्षात घेणे हे देखील आरशामुळे समजू शकते. ओव्हरटेक करणारे वाहन अनेकदा हॉर्न देत नाही, ते त्याच्या रांगेतून सरळ पुढे जात असते, मात्र आपण रांगेत नीट नसलो किंवा त्या वाहनाला लागणारी पुरेशी जागा आपण सोडलेली नसली तर त्यावेळी तुम्हाला आरशाची गरज लागते. मागून येणारे वाहन व तुमचे वाहन तुमच्या रांगेत किती नीट आहे, ते लक्षात येते. आरशात मध्ये मध्ये बघून वाहन चालन करण्याची सवय ठेवावी लागते, मात्र आरसे नसणे किंवा ते मोडके वा मान टाकलेल्या स्थितीत असणे यामुळे आरशात बघून मागील वाहनांचा अंदाज घेण्याची मानसिकता संपते,सवय मोडते आणि त्याचे फटके मात्र मोठे बसू शकतात.

यासाठीच दुचाकीवरील आरशाची स्थिती चांगली असणे गरजेचे आहे. पार्किंग केलेले असताना आरशामध्ये आपला चेहरा न्याहाळत बसणारे व त्यासाठी दुचारी वा एकंदर वाहनांच्या आरशांना फिरवणारे महाभागही कमी नसतात. पण त्यामुळे आरशांचे अनेकदा नुकसान होत असते. आरसे तुटत असतात,खराब होत असतात, अशावेळी काही झाले तरी आरसा बदलणे, नीट करणे गरजेचे असते.आरशाला अन्य लोक हात लावताना दिसले तर त्याला प्रत्येक नागरिकानेही विरोध करून त्या व्यक्तीला समजावले पाहिजे. दुचाकी सुरू करण्यापूर्वी आरसे आपल्याला योग्य पद्धतीने जुळवून घेतले पाहिजेत, त्यामुळे आरशाचा वापर योग्य रितीने होऊ शकेल. तुमच्या ड्रायव्हींग कौशल्याचे प्रतिबिंब तुमच्या दुचाकीच्या आरशाद्वारेच पडत असते, हे लक्षात ठेवा.

Web Title: Your scooter and motorbike should have good mirrors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन