अडवाणीला दुहेरी विजेतेपद; २१ व्यांदा विश्व चॅम्पियन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 02:17 AM2018-11-19T02:17:10+5:302018-11-19T02:19:21+5:30
भारताचा दिग्गज क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने रविवारी येथे आयबीएसएफ विश्व बिलियर्डस् चॅम्पियनशिपच्या मोठ्या आणि छोट्या दोन्ही प्रारूपात विजेतेपद पटकावले. त्याने ही कामगिरी चौथ्यांदा केली आहे.
यांगून : भारताचा दिग्गज क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने रविवारी येथे आयबीएसएफ विश्व बिलियर्डस् चॅम्पियनशिपच्या मोठ्या आणि छोट्या दोन्ही प्रारूपात विजेतेपद पटकावले. त्याने ही कामगिरी चौथ्यांदा केली आहे. बंगळुरूच्या ३३ वर्षांच्या अडवाणी याचे हे २१ वे विश्व विजेतेपद आहे. अडवाणी याने अंतिम लढतीत दोन वेळच्या आशियाई रौप्यपदक विजेत्या भारताच्या बी.भास्कर याला फर्स्ट टू १५०० लढतीत मात दिली.
अडवाणी याने १९० च्या ब्रेकने सुरुवात केल्यानंतर १७३ आणि १९८ चा ब्रेक बनवत भास्करवर मोठी आघाडी घेतली. जेव्हा त्याचे १००० गुण झाले तेव्हा भास्करचे फक्त २०६ गुण होते. अडवाणी हा जगातील एकमेव खेळाडू आहे, जो जागतिक स्तरावर बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळून सलग विजयी कामगिरी करत आहे. अडवाणी याने यावर्षी तीन विश्व विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे. (वृत्तसंस्था)