ऑल इंग्लंड बॅडमिंटन : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 09:02 PM2018-03-15T21:02:40+5:302018-03-15T21:02:40+5:30
भारताच्या पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. महिला एकेरी विभागात सिंधूने थायलंडच्या नित्चाओन जिंदापोलवर विजय मिळवला.
नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. महिला एकेरी विभागात सिंधूने थायलंडच्या नित्चाओन जिंदापोलवर विजय मिळवला.
स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सिंधूपुढे थायलंडच्या जिंदापोलचे कडवे आव्हान होते. ही लढत जवळपास 1 तास 7 मिनिटांपर्यंत रंगली. या अटीतटीच्या लढतीत सिंधूने जिंदापोलवर 21-13, 13-21, 21-18 अशी मात केली आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली.
पहिल्या गेममध्ये सिंधू 11-5 अशा आघाडीवर होती. त्यानंतर जिंदापोलने जोरदार आक्रमण केले, पण सिंधूने तिचे हे आक्रमण थोपवून लावले आणि 21-13 अशा फरकाने हा गेम जिंकला. पहिला गेम गमावल्यावर मात्र जिंदापोलने सामन्यात दमदार पुनरागमन केले. दुसरा गेम 21-13 असा जिंकत तिने सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली. त्यामुळे तिसरा गेम चांगलाच निर्णायक ठरला.
तिसऱ्या गेममध्ये सिंधूने 3-0 अशी आघाडी घेतली होती. पण जिंदापोलनेही चांगला खेळ करत सिंधूबरोबर 9-9 अशी बरोबरी केली. त्यानंतर दोघींनीही प्रत्येकी दोन गुण पटकावले आणि 11-11 अशी बरोबरी झाली. प्रत्येक गुण मिळवण्यासाठी दोघींमध्ये चुरशीची स्पर्धा सुरु होती. काही मिनिटांमध्ये दोघी पुन्हा 16-16 अशा बरोबरीवर आल्या होत्या. पण त्यानंतर मात्र सिंधूने आपला अनुभव पणाला लावला. स्वत:च्या चुका कमी करण्यावर भर देत सिंधूने जोरदार आक्रमण करत हा गेम 21-18 असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
आतापर्यंत या दोघींमध्ये चार सामने झाले आहेत. त्यापैकी सिंधूने सलग दोन सामने जिंकले आहेत. एकूण चार सामन्यांमध्ये सिंधूच्या नावावर तीन विजय आहेत.