अश्विनी, लक्ष्य यांचा बॅडमिंटन सराव सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:47+5:302020-06-05T05:00:55+5:30
कोरोनामुळे सर्व खेळाडू दोन महिने घरीच बंदिस्त होते. साईने मागच्या महिन्यात सराव सुरू करण्यासंदर्भात दिशानिर्देश दिल्यानंतर खेळाडूंना पुन्हा कोर्र्टवर परतणे शक्य झाले आहे.
नवी दिल्ली : आघाडीचे बॅडमिंटन खेळाडू अश्विनी पोनप्पा आणि लक्ष्य सेन यांच्यासह २० खेळाडूंनी कोरोना लॉकडाऊननंतर पुन्हा बेंगळुरू येथील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत सराव सुरू केला आहे.
कोरोनामुळे सर्व खेळाडू दोन महिने घरीच बंदिस्त होते. साईने मागच्या महिन्यात सराव सुरू करण्यासंदर्भात दिशानिर्देश दिल्यानंतर खेळाडूंना पुन्हा कोर्र्टवर परतणे शक्य झाले आहे. अकादमीचे मुख्य कोच आणि संचालक विमल कुमार म्हणाले, ‘काही आघाडीचे राष्टÑीय खेळाडू मागच्या दोन आठवड्यापासून येथे सराव करीत आहेत. आमच्याकडे १६ कोर्ट आहेत, जवळपास २० खेळाडू सरावात सहभागी असून सर्वांसाठी वेगवेगळ्या वेळा ठरवण्यात आल्या आहेत.’ एकूण ६५ पैकी बरेचशे खेळाडू सध्या शहरात नाहीत, मात्र ते येथे येण्यास आणि सराव करण्यास उत्सुक असल्याची माहिती विमलकुमार यांनी दिली.
सध्याचा सराव केवळ ऐच्छिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय भारताचे प्रतिनिधित्व करणारा मिथुन मंजुनाथ, बी. एम. राहुल भारद्वाज तसेच मेसनाम मेहराबा हेदेखील सराव करीत आहेत. दीर्घकाळ सराव आणि सामन्यांपासून दूर राहिलेल्या खेळाडूंना सूर गवसण्यास किमान सहा आठवडे लागतील, असे विमल यांचे मत आहे. ते म्हणाले, ‘गेली दोन महिने सरावास मुकलेले हे खेळाडू ३० ते ४० टक्के तरबेजपणा गमावू शकतात.
अकादमीत जे खेळाडू सरावात व्यस्त आहेत त्यात राष्टÑकुल स्पर्धेत तीनवेळा पदक विजेती दुहेरीची खेळाडू अश्विनी पोनप्पा, जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर राहिलेला अजय जयराम आणि मागच्या सत्रात पाच स्पर्धा जिंकणारा लक्ष्य सेन यांचा समावेश आहे.