नियमांवरून बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद संभ्रमात, प्रणाली बदलणार: २१ ऐवजी ११ गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:03 AM2018-02-28T01:03:22+5:302018-02-28T01:03:22+5:30
बॅडमिंटनमध्ये सध्या २१ गुणांचा एक गेम खेळला जातो. बेस्ट आॅफ थ्री गेमच्या आधारे निकाल येत असतो. विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) प्रचलित पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टवर मार्गदर्शन करण्याची वेळही कमी करण्याच्या प्रस्तावित बदलामुळे प्रशिक्षक मात्र संभ्रमात आहेत.
नवी दिल्ली : बॅडमिंटनमध्ये सध्या २१ गुणांचा एक गेम खेळला जातो. बेस्ट आॅफ थ्री गेमच्या आधारे निकाल येत असतो. विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) प्रचलित पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टवर मार्गदर्शन करण्याची वेळही कमी करण्याच्या प्रस्तावित बदलामुळे प्रशिक्षक मात्र संभ्रमात आहेत.
सामन्यादरम्यान प्रत्येक गेममध्ये ११ गुण झाल्यास कोर्टवर मार्गदर्शन करण्यास मान्यता आहे. सध्याच्या तीन गेमच्या जागी बेस्ट आॅफ फाईव्ह गेममध्ये सामना खेळविण्याचा प्रस्ताव असून २१ ऐवजी ११ गुणांचा सामना खेळविण्याचे नव्या नियमात प्रस्तावित करण्यात आले आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद म्हणाले, ‘कोर्टवर मार्गदर्शन करण्यावर नियंत्रण आणण्यासाठी लागू करण्यात येणा-या नियमांमागील तर्क पटण्यासारखे नाहीत. संभाव्य बदलाचा सविस्तर ड्राफ्ट मी पाहिलेला नाही. आधी कोर्टवर मार्गदर्शन होत नव्हते तेव्हा हा नियम समाविष्ट करण्यात आला. आता पुन्हा नियंत्रण आणू इच्छितात. यामागील तर्क कळलेला नाही.’
व्हिक्टर एक्सलसेन याला विश्व चॅम्पियनशिपचे सुवर्ण आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचविण्यारे डेन्मार्कचे मुख्य कोच केनेथ हे देखील कोर्टवर खेळाडूंना मार्गदर्शन करण्याबाबत अनुकूल आहेत. यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढते, असे त्यांचे मत आहे.(वृत्तसंस्था)
निर्णयाचे समर्थन
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक विमल कुमार आणि सय्यद मोहम्मद आरिफ यांनी मात्र प्रस्तावित बदलाचे समर्थन केले. हा बदल खेळाडूंना भक्कम करेल, असे दोघांचे मत आहे. गुणांच्या प्रस्तावावर गोपीचंद म्हणाले, ‘सुरुवातीला काही खेळाडूंना लाभ होईल. पण नियम बदलण्याच्या कारणांवर मी समाधानी नाही.’