बॅडमिंटनपटूंची १ जुलैपासून सरावाची योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 02:05 AM2020-06-27T02:05:40+5:302020-06-27T02:05:44+5:30
हैदराबादमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडल्याने तेलंगणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला. यामुळे खेळाडूंच्या सरावाची संधी हुकली.
नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) हैदराबाद येथे १ जुलैपासून सराव सुरू करण्याची योजना आखली आहे. राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यास सिंधूसह दिग्गज खेळाडूंना कोर्टवर उतरण्याची संधी मिळेल. साइने मागच्या महिन्यात खेळाडूंसाठी निर्देश प्रसिद्ध केल्यानंतर काही जणांनी बेंगळुरूतील प्रकाश पदुकोण अकादमीत सराव सुरू केला. हैदराबादमध्ये वास्तव्यास असलेल्या खेळाडूंना मात्र अद्याप सरावाची प्रतीक्षा आहे. हैदराबादमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडल्याने तेलंगणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला. यामुळे खेळाडूंच्या सरावाची संधी हुकली.
बीएआय सचिव अजय सिंघानिया यांनी सांगितले की, महामारीमुळे सराव थांबला आहे. स्थितीचा आढावा घेतल्यानंतर हैदराबाद येथे सराव सुरू करण्याचा निर्णय घेतला, मात्र हे सरकारच्या परवानगीवर अवलंबून असेल. कोरोनामुळे बीएआयने २७ एप्रिल ते ३ मे या कालावधीत आयोजित सिनियर राष्टÑीय स्पर्धा मार्चमध्येच स्थगित केली होती. आता सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होऊ शकणार नाही. या संदर्भात सर्व राज्य संघटनांचे मत जाणून घेतल्याची माहिती सिंघानिया यांनी दिली. (वृत्तसंस्था)