भारतीय क्रीडाक्षेत्राच्या नव्या यशोस्तंभाच्या जिद्दीची ही कहाणी, किदांबी श्रीकांतने मैदानाबाहेर कोणत्या दोन संकटांना दिली मात?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 01:20 PM2017-11-02T13:20:24+5:302017-11-02T13:22:51+5:30
केवळ प्रतिस्पर्धी खेळाडूंनाच मात दिलेली नाही तर साधारण तीन वर्षापूर्वी अक्षरशः मृत्युलासुध्दा मात दिली आहे. त्यातून सावरल्यावर गेल्याच वर्षी कठोर परिक्षा घेणाऱ्या भयंकर दुखण्यावरसुध्दा विजय मिळवला
ललित झांबरे/ ऑनलाईन लोकमत
मुंबई- भारतीय क्रीडा क्षेत्राचा नवा सुपरस्टार, सुपर कूल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने यंदा भल्याभल्यांना मात दिली. लीन दान व ली चौंग वेईसारख्या मातब्बर खेळाडूंचे बॅडमिंटनमधील वर्चस्वाचे दिवस संपले असल्याची भाषा तो करु लागलाय. वर्षभरात चार-चार सुपर सिरिज अजिंक्यपदं पटकावून तो लीन दान, ली चोंग वेई आणि चेन लाँग यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसलाय. मात्र असे करताना त्याने केवळ प्रतिस्पर्धी खेळाडूंनाच मात दिलेली नाही तर साधारण तीन वर्षापूर्वी अक्षरशः मृत्युलासुध्दा मात दिली आहे. त्यातून सावरल्यावर गेल्याच वर्षी कठोर परिक्षा घेणाऱ्या भयंकर दुखण्यावरसुध्दा विजय मिळवला आहे. या दोन्ही संकटांवेळी कच खाल्ली असती तर त्याला खेळच सोडावा लागला असता परंतु मोठ्या हिमतीने त्याने या संकटांचा मुकाबला केला, तो जिद्दीने पुन्हा कोर्टवर परतला आणि वर्षभरातच सर्वात सफल बॅडमिंटनपटूंच्या पंक्तीत जाऊन बसला. वर्षाला चार-चार सुपर सिरिज स्पर्धा जिंकणारा तो केवळ चौथाच खेळाडू आहे. अवघ्या 24 वर्षे वयाच्या गुंटुरच्या या खेळाडूच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत आलेली ही दोन महाभयानक संकट कोणती होती? आणि त्याने त्यावर कशी मात केली? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 2014 मध्ये जावे लागले. त्यावर्षीच्या जुलैमध्ये नेमक्या राष्ट्रकुल सामन्यांच्या तोंडावर त्याला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला आणि एका दिवशी त्याचे थोरले बंधू, के. ननगोपाळ यांना तो बाथरुममध्ये बेशुध्दावस्थेत आढळून आला. त्यांनी तातडीने श्रीकांतला दवाखान्यात हलवले. त्याला अतिदक्षता विभागात अॅडमिट करण्यात आले आणि चाचण्यांअंती श्रीकांतला मेंदूज्वर असल्याचे निदान झाले. दोन आठवडे त्याच्यावर औषधोपचार चालले परंतु राष्ट्रकुल सामने तोंडावर असल्याने त्याला अँटीबायोटीक्स घेण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे या आजारातून पूर्ण सावरलेला नसतानासुध्दा राष्ट्रकुल सामन्यांमध्ये खेळताना त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. यानंतर काही दिवसातच चीन ओपन स्पर्धा जिंकताना लीन दान याला 21-19, 21-17अशी मात देत त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या यशाबद्दल ननगोपाळ सांगतात,"ज्या स्थितीतून तो गेला होता ते पाहता आम्ही या विजेतेपदाची अजिबात अपेक्षा केलेली नव्हती पण या विजयाने तो मानसिकदृष्ट्या किती खंबीर आहे ते दाखवून दिले." यानंतर रियो अॉलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत कडवा संघर्ष केल्यानंतरही त्याला लिन दानकडू हार पत्करावी लागली. या पराभवाने त्याला खूप निराशा आली आणि काही काळासाठी ब्रेक घेत त्याने घरी राहणेच पसंत केले. त्या निराशेतून बाहेर आल्यावर पुन्हा खेळायला सुरुवात केली तर जपान ओपनवेळी त्याच्या टाचेला दुखापत झाली. उजव्या पायाला प्लास्टर बांधावे लागले आणि श्रीकांत पुन्हा इच्छा नसताना मैदानाबाहेर बसला. मात्र तो नुसता बसून नाही राहिला तर त्या स्थितीत पायाला प्लास्टर असतानासुध्दा तो स्टूलवर बसल्या बसल्या वेगवेगळ्या फटक्यांचा सराव करताना दिसला. त्याचा व्हिडिओसुध्दा व्हायरल झाला. या दिवसांबद्दल माहिती देताना स्वतः बॅडमिंटनपटू असलेले श्रीकांतचे थोरले बंधू ननगोपाल सांगतात, "श्रीकांतसाठी कदाचित हा सर्वात कठीण काळ असावा. अॉलिम्पिकमधील कामगिरीने, विशेषतः लीन दानला तिसऱ्या गेमपर्यंत खेचल्यावरसुध्दा आलेल्या पराभवाने आधीच तो निराश होता, त्यानंतर या दुखण्याने त्याला तब्बल चार महिने मैदानाबाहेर बसवले. महिनाभर तर त्याला हलतासुध्दा येत नव्हते. त्यानंतर त्याने स्वतःच हिंमत बांधली आणि फिटनेसच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. तो केवळ बसल्या बसल्याच काही फटके मारु शकत होता आणि शरीराच्या वरच्या भागाचेच व्यायाम करु शकत होता. अशा स्थितीत गोपीभैय्यांनी (पी. गोपीचंद) त्याला फार साथ दिली. मला वाटते या प्रसंगानेच त्याला संयम राखण्यास शिकवले. परंतु त्याही स्थितीत तो आम्हाला सांगायचा, बघा, माझेही दिवस येतील." आणि बघा...श्रीकांतच्या म्हणण्याप्रमाणे वर्षभरातच त्याचे दिवससुध्दा आले. वर्षभरात चार चार सुपर सिरीज स्पर्धा जिंकणारा जगातील केवळ चौथा आणि ग्रँड प्रिक्स, सुपर सिरिज आणि सुपर सिरिज प्रिमियर आसा तिहेरी मुकूट जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.