बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या खेळात कुठलीच उणीव नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:07 AM2018-08-08T04:07:29+5:302018-08-08T04:07:37+5:30
गेल्या दोन वर्षांत मोठ्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यात पराभूत होणारी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिच्या खेळात कुठलीच उणीव नसल्याचे मत माजी दिग्गज प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षांत मोठ्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यात पराभूत होणारी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिच्या खेळात कुठलीच उणीव नसल्याचे मत माजी दिग्गज प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले. सिंधूने पुढीलवर्षी सुवर्ण लक्ष्य ठेवूनच वाटचाल करावी, असा सल्लादेखील त्यांनी दिला.
सिंधूला सलग दुसऱ्यांदा विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. २३ वर्षांची सिंधू निर्णायक लढतीत २०१६ पासून आठवेळा पराभूत झाली. याआधी, रिओ आॅलिम्पिक, हाँगकाँग ओपनमध्ये २०१७ आणि २०१८, सुपरसिरिज फायनल २०१७, इंंडिया ओपन २०१८ आणि थायलंड ओपन २०१८ आदी स्पर्धेत अंतिम सामन्यात सिंधू पराभूत झाली.
सिंधूला रविवारी नानजिंग येथे विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आॅलिम्पिक चॅम्पियन कौरोलिना मारिन हिच्याकडून १९-२१,१०-२१ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता.
सिंधूच्या कामगिरीबाबत विचारताच एकेकाळी जागतिक बॅडमिंटनमध्ये नंबर वन राहिलेले पदुकोण म्हणाले,‘माझ्यामते सिंधू चांगली खेळत आहे. सलग दुसºयांदा अंतिम फेरीत पोहोचली याचे श्रेय तिला द्यायलाच हवे. विश्वस्तरावर कडवी स्पर्धा असल्याने कुणीही बाजी मारू शकतो. सिंधूने पुढीलवर्षी सुवर्ण जिंकण्याचे लक्ष्य ठेवून खेळायला हवे. पण या स्पर्धेदरम्यान सिंधूने जपानच्या दोन खेळाडूंना हरविले. आधी ती या खेळाडूंकडून पराभूत व्हायची. अंतिम सामना जिंकता आला नाही, तरीही कामगिरी चांगलीच होती.’आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये सिंधू आणि मारिन कट्टर प्रतिस्पर्धी ओळखल्या जातात. २०१६ साली झालेल्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही मारिननेच सिंधूला पराभवाचा धक्का दिला होता.
‘ती महान खेळाडू आहेच, यात शंका नाही. युवा असल्याने बराच पल्ला गाठायचा आहे. निवृत्तीपर्यंत बºयाच स्पर्धा जिंकू शकते. इंडोनेशियाच्या कोचने भारतीय संघासोबतचे नाते संपुष्टात आणले तरी पुलेला गोपीचंदच्या मार्गदर्शनात खेळाडू चांगली वाटचाल करीत आहेत.
खेळाडू अधिक असल्याने गोपीचंद यांना सहकारी द्यायला हवा. एकाचवेळी सर्वांवर लक्ष देणे त्यांना यांना जड जात असल्याचे दिसले.’
- प्रकाश पदुकोण