राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संधी - के. श्रीकांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:53 AM2017-10-19T00:53:13+5:302017-10-19T00:53:35+5:30
भारतीय बॅडमिंटनपटूंनी यंदाच्या सत्रात शानदार यश संपादन केले असून पुढील वर्षीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू बॅडमिंटनमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत याने व्यक्त केला आहे.
ओंडेसे : भारतीय बॅडमिंटनपटूंनी यंदाच्या सत्रात शानदार यश संपादन केले असून पुढील वर्षीच्या राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू बॅडमिंटनमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत याने व्यक्त केला आहे.
डेन्मार्क ओपनमध्ये श्रीकांतची सलामीला आपलाच सहकारी शुभांकर डे याच्याविरुद्ध लढत होत आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला श्रीकांत म्हणाला, ‘मागच्या राष्ट्रकुल स्पर्धेत आम्ही पुरेशी पदके जिंकली. चार वर्षांत बरीच प्रगती केली असल्यामुळे या खेळात अधिक पदके मिळू शकतात. आमचा संघ तगडा आहे.’
डेन्मार्क ओपन सुपर सिरीजच्या उपांत्यपूर्व लढतीत श्रीकांतची गाठ विश्व चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेन याच्याशी पडू शकते. श्रीकांत मागील तिन्ही सामन्यांत एक्सेलसेनकडून सरळ गेममध्ये पराभूत झाला होता. तरीही मी चिंतेत नाही, असे श्रीकांतने स्पष्ट केले.
एक प्रतिस्पर्धी या नात्याने एक्सेलसेनने खेळात फारच प्रगती केली. मी दोनदा त्याच्यावर विजय नोंदविला आहे. पण मागील तिन्ही सामन्यांत मी त्याच्याकडून सरळ गेममध्ये पराभूत झालो. दुबईत २०१५ मध्ये मी त्याच्याविरुद्ध खेळलो तेव्हा त्या सत्रातील ती सलगपणे पाचवी स्पर्धा होती. मी त्या वेळी सर्वश्रेष्ठ कामगिरी करू शकलो नव्हतो.
यंदा इंडिया ओपनदरम्यान खेळताना मी जखमेतून सावरलो होतो तर तो सर्वोच्च शिखरावर होता. त्याने मला मागे टाकले. मागच्या वेळी
आम्ही जपान ओपनमध्ये पुन्हा एकदा परस्परांपुढे आलो तेव्हा १७-१७ अशी बरोबरी झाली.
त्या वेळी कुणीही बाजू मारणे शक्य होते. मी एक्सेलसेनला तगडे आव्हान दिले आहे. पराभवाचे शल्य नाहीच. पुढच्या वेळी त्याच्याविरुद्ध खेळेल तेव्हा तो सामना वेगळाच असेल. भूतकाळातील निकालांबाबत विचार करीत दडपण घेणार नाही, असे श्रीकांतने स्पष्ट केले.
(वृत्तसंस्था)
श्रीकांतने सातत्य राखावे
डेन्मार्कचे मुख्य कोच केनेथ जोनासेन यांनी श्रीकांतचे कौतुक करीत तो लढवय्या असल्याचे म्हटले आहे. चॅम्पियन होण्यासाठी खेळात अधिक सातत्य आणण्याचादेखील त्यांनी श्रीकांतला सल्ला दिला. श्रीकांत कोर्टवर खरा अॅथलिट वाटतो. त्याने खेळात अधिक सातत्य राखल्यास नंबर वन होणे श्रीकांतसाठी कठीण जाणार नाही, असे जोनासेन म्हणाले.