पी. व्ही. सिंधू, श्रीकांत यांच्यापुढे कामगिरी उंचावण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 01:49 AM2019-03-26T01:49:52+5:302019-03-26T01:50:48+5:30
माजी चॅम्पियन पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत फॉर्ममधील चढ-उतारातून सावरत इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने सहभागी होणार आहेत.
नवी दिल्ली : माजी चॅम्पियन पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत फॉर्ममधील चढ-उतारातून सावरत इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने सहभागी होणार आहेत. पोटाच्या त्रासामुळे सायना नेहवालने देशातील या अव्वल बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर मंगळवारपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेत भारताची भिस्त सिंधू व श्रीकांत यांच्यावर राहील.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विश्व टूर फायनल्सचे जेतेपद पटकावणारी आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला चीनच्या अव्वल मानांकित व गत आॅल इंग्लंड चॅम्पियन चेन यूफेईच्या माघारीमुळे विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. जपानच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीचाही सिंधूला लाभ मिळण्याची शक्यता आहे. सिंधूने नव्या मोसमात इंडोनेशिया मास्टर्सच्या क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले होते, पण प्रतिष्ठेच्या आॅल इंग्लंडमध्ये ती पहिल्याच फेरीत गारद झाली होती. २०१७ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर सिंधूने गेल्या वर्षीही इंडिया ओपनची अंतिम फेरी गाठली होती. या कामगिरीपासून प्रेरणा घेण्यासाठी ती प्रयत्नशील असेल.
सिंधू आपल्या मोहिमेची सुरुवात मायदेशातील सहकारी मुग्धा आग्रेविरुद्धच्या लढतीने करणार असून उपांत्यपूर्व फेरीत तिची लढत आठव्या मानांकित डेन्मार्कच्या मिया ब्लिकफेल्टसोबत होऊ शकते. या लढतीत विजय मिळवल्यानंतर तिची गाठ चीनच्या तिसऱ्या मानांकित बिंगजाओसोबत पडू शकते. या विश्व टूर सुपर ५०० स्पर्धेत रुशाली गम्मादी व साई उत्तेजिता राव चुका यांच्यासारख्या युवा खेळाडूही भारताचे प्रतिनिधित्व करतील.
दुसरीकडे, ही स्पर्धा तिसऱ्या मानांकित श्रीकांतसाठी महत्त्वाची आहे. कारण गेल्या १७ महिन्यात त्याला कोणतेही जेतेपद जिंकता आले नाही. गत चॅम्पियन व अव्वल मानांकित चीनच्या शी युकीने माघार घेतल्यानंतर २०१५ चा विजेता श्रीकांत व माजी विश्व चॅम्पियन डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसन जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. एक्सेलसनने सलग तीन वर्षे अंतिम फेरी गाठल्यानंतर २०१७ मध्ये जेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)
श्रीकांतने आपले पहिले जेतेपद २०१७ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये जिंकले होते. श्रीकांत सलामीला हाँगकाँगच्या वोंग विंग की विन्सेटविरुद्ध खेळेल. त्यानंतर त्याला देशबंधू समीर वर्मा किंवा बी. साई प्रणीत यांच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.