अव्वल स्थानापेक्षा राष्ट्रकुल पदक महत्त्वाचे- किदाम्बी श्रीकांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:56 AM2018-03-24T01:56:10+5:302018-03-24T01:56:10+5:30
चार वर्षांपूर्वी आजारामुळे बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांत याची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कामगिरी ढेपाळली होती. यंदा गोल्ड कोस्टमध्ये पदक जिंकण्याच्या इराद्यानेच श्रीकांत स्पर्धेत उतरणार आहे.
नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी आजारामुळे बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांत याची राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत कामगिरी ढेपाळली होती. यंदा गोल्ड कोस्टमध्ये पदक जिंकण्याच्या इराद्यानेच श्रीकांत स्पर्धेत उतरणार आहे.
ग्लास्गो राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या काही दिवस आधी श्रीकांत आजारी पडला होता. गोपीचंद अकादमीत तो बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत पडलेला आढळला होता. आठवडाभर आयसीयूत ठेवल्यानंतर त्याला मेंदूज्वर झाल्याचे निष्पन्न झाले होते. या कटु स्मृती विसरून आज देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनलेला श्रीकांत देशासाठी पदक जिंकण्यास सज्ज आहे. त्याच्या नावावर चार प्रतिष्ठेची जेतेपदे आहेत, शिवाय त्याला नुकताच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
२०१४ ची घटना सांगताना श्रीकांत म्हणाला,‘ताप आल्यामुळे मी आजारी पडलो होतो. कुणीही मला त्या घटनेबद्दल सांगू इच्छित नाही. मी बरा होऊन राष्टÑकुलमध्ये खेळलो पण उपांत्यपूर्व फेरीामध्ये सिंगापूरच्या खेळाडूकडून पराभूत झालो. चार वर्षानंतर आता पदकाची आशा पल्लवित झाली आहे. मागील वर्षभरात मी आणखी अनुभवी बनलो. त्यामुळे राष्ट्रकुलचे पदक जिंकण्यास माझे प्राधान्य राहील. यंदा अव्वल स्थानावर पोहोचण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असेल ते राष्ट्रकुलचे पदक जिंकणे.’ (वृत्तसंस्था)
भारताच्या खात्यात केवळ तीन पदक
पारुपल्ली कश्यप याने ग्लास्गो राष्टÑकुलमध्ये सुवर्ण जिंकून ३२ वर्षानंतर पुरुष एकेरीत भारतासाठी सुवर्णमय कामगिरी केली. यंदा श्रीकांतच्या खेळावर देशातील कोट्यवधी चाहत्यांची नजर असेल. कश्यपपूर्वी केवळ प्रकाश पदुकोण(१९७८) आणि सय्यद मोदी(१९८२)यांनी या खेळात राष्टÑकुल सुवर्ण जिंकले होते. श्रीकांत म्हणाला, मागच्यावेळी आम्ही चांगले पदक जिंकलो. यंदा चार वर्षांआधीच्या तुलनेत आघाडीवर असल्याने पदके जिंकण्याची शक्यता बळावली आहे.’