राष्ट्रकुल स्पर्धा : सिंधूला तंदुरुस्त होण्याची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 01:35 AM2018-04-02T01:35:55+5:302018-04-02T01:35:55+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त असलेली पी.व्ही.सिंधू हिला आशा आहे की ती स्पर्धेच्या आधी तंदुरुस्त होईल तसेच भारत या स्पर्धेत पदकेदेखील पटकावेल.
नवी दिल्ली - राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त असलेली पी.व्ही.सिंधू हिला आशा आहे की ती स्पर्धेच्या आधी तंदुरुस्त होईल तसेच भारत या स्पर्धेत पदकेदेखील पटकावेल.
सिंधूला मंगळवारी गोपीचंद अकादमीत सराव करताना ही दुखापत झाली होती. त्यानंतर ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे समोर आले होते.
सिंधू हिने सांगितले की,‘स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने सर्वकाही ठीक चालले होते. दुर्दैवाने माझ्या घोट्याला दुखापत झाली. मला वाटते की स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मी फिट होईल.’
सिंधूला चार वर्षांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र आता बराच बदल झाला आहे. भारताची आघाडी खेळाडू असलेली सिंधू आता राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची दावेदार आहे.
सिंधू म्हणाली, ‘गेल्या वेळी राष्ट्रकुल स्पर्धेत मी कांस्यपदक पटकावले होते. या वेळी मी आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्यास उत्सुक आहे. आम्ही नक्कीच पदक जिंकू. मला वाटते की राष्ट्रकुल स्पर्धेत मला आपला सर्वोत्कृष्ट खेळ दाखवावा लागेल.’ (वृत्तसंस्था)
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघ नक्कीच चमकदार कामगिरी करेल असा विश्वास सिंधूने व्यक्त केला. ती म्हणाली की, ‘मी निश्चित पदकांची संख्या सांगू शकणार नाही. पण, यंदा भारतीय संघ नक्कीच खूप पदक जिंकण्यात यशस्वी होईल.’ सध्या फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूकडून प्रत्येकाला सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.
याविषयी ती म्हणाली की, ‘प्रत्येकाला माझ्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने माझी तयारीही सुरु आहे. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी असून प्रत्येकाची इच्छा आहे की मी विजयी व्हावं. मला माझा सर्वोत्तम खेळ करुन नैसर्गिक खेळ करावा लागेल.’