coronavirus: एकाच स्थळावर जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन करा, गोपीचंद यांची बीडब्ल्यूएफला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 04:23 AM2020-05-12T04:23:27+5:302020-05-12T04:23:57+5:30
जगभरात आतापर्यंत ४१ लाखापेक्षा अधिक लोकांना लागण झालेला आणि तीन लाखापेक्षा अधिक व्यक्तींच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या कोरोना व्हायरसमुळे बीडब्ल्यूएफने आॅलिम्पिक क्वालिफायर्ससह आपल्या सर्व स्पर्धा जुलैपर्यंत स्थगित केलेल्या आहेत.
नवी दिल्ली : कोविड-१९ नंतर विश्व बॅडमिंटन महासंघाने जगात या खेळाचे योग्य प्रकारे संचालन करण्यासाठी काही नव्या पद्धतींचा अवलंब करायला पाहिजे आणि एकाच स्थळावर जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन करायला हवे, अशी सूचना भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी विश्व महासंघाला केली आहे.
जगभरात आतापर्यंत ४१ लाखापेक्षा अधिक लोकांना लागण झालेला आणि तीन लाखापेक्षा अधिक व्यक्तींच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या कोरोना व्हायरसमुळे बीडब्ल्यूएफने आॅलिम्पिक क्वालिफायर्ससह आपल्या सर्व स्पर्धा जुलैपर्यंत स्थगित केलेल्या आहेत.
गोपीचंद म्हणाले, ‘बीडब्ल्यूएफने स्वास्थ्य कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करायला हवी. स्वरूप बदलायला हवे. स्पर्धेचे फॉर्मेट बदलायला हवे. आवश्यक असलेले सर्व बदल करायला हवे. माझ्या मते जर काही नवे करण्याची गरज असेल तर तसे करा आणि खेळाची आगेकूच कायम राखा.’
आंतरराष्ट्रीय सर्किटचा बचाव करण्यासाठी बीडब्ल्यूएफने थॉमस व उबेर कप यासारख्या महत्त्वाच्या स्पर्धा आॅक्टोबरपर्यंत स्थगित केल्या आहेत आणि भारतासह सर्व संबंधित देशांना स्थगित करण्यात आलेल्या आॅलिम्पिक क्वालिफायर्सच्या नव्या तारखा निश्चित करण्यास सांगितले आहे.
गोपीचंद म्हणाले, ‘माझी चिंता ही आहे की, तुम्ही तारखा बदलण्याचा प्रयत्न करीत आहात, पण माझ्या मते कदाचित विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. जर असेच होत राहिले तर पूर्ण पथकाला पुन्हा विविध देशांचा प्रवास करावा लागला तर हे खेळाडूंना जोखमीमध्ये टाकण्यासारखे असेल.’
बॅडमिंटन खेळाडूंना जवळजवळ प्रत्येक आठवड्यात नव्या स्पर्धेसाठी प्रवास करावा लागतो. गोपीचंद म्हणाले, यात बदल व्हायला हवा. माझ्या मते खेळाडूंना एकाच स्थळावर जास्तीत जास्त स्पर्धा खेळण्याची संधी मिळायला हवी. भविष्यात हे करणे शक्य आहे.’
जागतिक स्वास्थ्य संकट बघता खेळ सुरू करण्यासाठी प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये लढतींचे आयोजन करण्यात येईल. गोपीचंद म्हणाले, ‘प्रेक्षक नसतील तर खेळ टीव्ही व इंटरनेटपर्यंत मर्यादित राहील तर स्पर्धेचे आयोजन तीन वेगवेगळ्या स्थळांवर करण्याला अर्थ उरत नाही. खेळाडूंनाही तीन आठवडे एकाच स्थानावर ठेवता येईल.’
ते पुढे म्हणाले, ‘उदाहरण द्यायचे झाल्यास स्पर्धा इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये आयोजित करण्याऐवजी या स्पर्धा कुठेही एकाच स्थळावर व्हायला हव्यात. ’ इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरला तीन महत्त्वाच्या आॅलिम्पिक क्वालिफायर्सचे यजमानपद भूषवायचे आहे. या व्यतिरिक्त भारतालाही एका स्पर्धेच्या यजमानपदाची संधी आहे. (वृत्तसंस्था)