coronavirus: सिन्थेटिक शटल, बीडब्ल्यूएफ निर्णय बदलण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:49 AM2020-05-16T04:49:19+5:302020-05-16T04:50:09+5:30
नवी दिल्ली : विश्व बॅडमिंटन महासंघ (बीडब्ल्यूएफ) कोविड-१९ महामारीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुढील वर्षी सिन्थेटिक शटलचा वापर करण्याच्या आपल्या योजनेला ...
नवी दिल्ली : विश्व बॅडमिंटन महासंघ (बीडब्ल्यूएफ) कोविड-१९ महामारीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुढील वर्षी सिन्थेटिक शटलचा वापर करण्याच्या आपल्या योजनेला स्थगिती देऊ शकते.
यंदा जानेवारीमध्ये या विश्व संस्थेने २०२१ पासून सर्व पातळीवरील मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिन्थेटिक पाकळ्या असलेल्या शटलच्या वापराला मंजुरी दिली होती. सध्या वापरात असलेले शटल साधारणपणे हंस किंवा बदकाच्या पंखापासून तयार करण्यात येतात. योनेक्स सनराईजचे (भारत) प्रमुख विक्रम धर यांच्या मते कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ही योजना अमलात आणण्यासाठी आणखी वर्षाचा कालावधी लागू शकतो. कोविड-१९ महामारीमुळे जवळजवळ सर्व बॅडमिंटन स्पर्धा स्थगित आहेत. त्यामुळे उद्योगजगताचे मोठे नुकसान झाले आहे.
धर यांना ज्यावेळी सिन्थेटिक शटलच्या २०२१ मध्ये उपयोगाबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘त्यासाठी वेळ लागेल. कदाचित वर्षभर प्रतीक्षा करावी लागू शकते.’
योनेक्सच्या तांत्रिक सहकार्याने विकसित सिन्थेटिक शटलला बीडब्ल्यूएफने मंजुरी दिली होती. हे शटल पक्ष्यांच्या पंखांऐवजी प्लास्टिकचा वापर करून तयार करण्यात आले होते. कंपनीने या योजनेचा विकास करताना विविध ‘प्रोटोटोईप’ची चाचणी घेतली.
भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंदही म्हणाले की, पुढील वर्षी सिन्थेटिक शटलचा वापर करणे शक्य होणार नाही. दरम्यान, त्यांनी नव्या तंत्राचे समर्थन केले. अनेक खेळाडू व प्रशिक्षकांनी अशा शटलच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले आहेत, पण गोपीचंद म्हणाले, सुरुवातीला खेळाडूंना थोडी अडचण होईल. त्यामुळे खेळात काही बदल येतील, पण यामुळे आपल्या देशातील (भारत) खेळाडूंना लाभ होईल की नुकसान होईल, याची कल्पना नाही.
अडचणीनंतरही मी सिन्थेटिक शटलचे समर्थन करणार आहे. कारण ज्यावेळी आपण किंमत व नियमांचा विचार करतो त्यावेळी नैसर्गिक पं ख दीर्घकालीन समस्येवर तोडगा नाहीत. त्यामुळे आपल्याला केव्हा ना केव्हा याचा स्वीकार करावाच लागेल.’ (वृत्तसंस्था)
सिन्थेटिक शटलचा वापर करायला हवा
गोपीचंद म्हणाले, ‘माझ्या मते पुढील आॅलिम्पिकमध्ये याचा वापर होऊ शकतो. याची सुरुवात करणे किती सोपे राहील, याची मला कल्पना नाही. दीर्घकालीन रूपाने सिन्थेटिक शटलचा वापर करायला हवा, असे मला वाटते.’ ‘सध्या ही एक अडचण आहे, याची मला कल्पना आहे, पण आम्हाला नैसगिक पंखांच्या पर्यायाची गरज आहे. आपण एचवनएनवन इको बघितले आहे. ज्यावेळी सिन्थेटिक शटलचा उपयोग होईल त्याची खेळाला सर्वदृष्टीने मदतच होईल.’