Coronavirus : ‘आधी चाचणी, त्यानंतर खेळण्याची परवानगी’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 04:01 AM2020-03-18T04:01:30+5:302020-03-18T04:01:59+5:30
ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतरच खेळण्याची परवानगी देण्यात यावी
नवी दिल्ली : ‘कोरोना महामारीमुळे सर्वच क्रीडा स्पर्धा, सराव बंद आहेत. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतरच खेळण्याची परवानगी देण्यात यावी,’ अशी मागणी भारतीय बॅडमिंटनचे माजी मुख्य प्रशिक्षक विमल कुमार यांनी मंगळवारी सरकारकडे केली आहे. तेलंगाणा आणि कर्नाटक राज्य सरकारच्या निर्देशानुसार हैदराबादला पुलेल्ला गोपिचंद अकादमी आणि बंगळुरूत प्रकाश पदुकोण अकादमी दोन अठवड्यांसाठी बंद करण्यात आली आहे.
रियो आॅलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू, पुरूष एकेरी खेळाडू बी. साई प्रणीत आणि पुरुष दुहेरी खेळाडू चिराग शेट्टी, सात्विक साईराज रांकीरेड्डी यांनी आतापर्यंत टोकियो आॅलिम्पिकसाठीची पात्रता मिळवली आहे.
विमल म्हणाले की, ‘खेळाडू स्वस्थ जीवनशैली आचरणात आणतात व सामान्य जनतेपेक्षा त्यांची रोग प्रतिरोधक क्षमता चांगली असते. त्यामुळे सरकारने आॅलिम्पिक खेळणाऱ्यांना आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतर सरावाची परवानगी द्यावी.’ त्यांनी सांगितले की,‘जर आॅलिम्पिक वर्ष नसते तर मी असे म्हटलेही नसते. मात्र ही स्पर्धा चार वर्षांनंतर एकदाच येते. त्यामुळे खेळाडूंची नियमीत चाचणी होत असते.’ (वृत्तसंस्था)