दुबई ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:22 AM2017-12-14T02:22:04+5:302017-12-14T02:22:12+5:30
भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने प्रतिष्ठेच्या दुबई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली खरी, परंतु यासाठी तिला चीनच्या ही बिंगजियाओ विरुद्ध तीन गेमपर्यंत झुंजावे लागले.
दुबई : भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने प्रतिष्ठेच्या दुबई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली खरी, परंतु यासाठी तिला चीनच्या ही बिंगजियाओ विरुद्ध तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. गुरुवारी सिंधूपुढे जपानच्या सयाका सातो हिचे कडवे आव्हान असेल. त्याच वेळी, पुरुष गटात मात्र भारताची सुरुवात निराशाजनक झाली. स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत याला
डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसन विरुद्ध सरळ दोन गेममध्ये पराभव पत्करावा लागला.
पदकाची दावेदार असलेल्या सिंधूने अपेक्षित सुरुवात करताना ही बिंगजियाओचे कडवे आव्हान २१-११, १६-२१, २१-१८ असे परतावले. जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानी असलेल्या सिंधूला या विजयासाठी जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या बिंगजियाओविरुद्ध झुंजावे लागले. पहिला गेममध्ये सहजपणे बाजी मारल्यानंतर बिंगजियाओने शानदार पुनरागमन करताना दुसरा गेम जिंकत सामना निर्णायक तिसºया गेममध्ये नेला. या वेळी, सिंधूवर काहीसे दडपण आले. तिसºया गेममध्ये सकारात्मक सुरुवात करताना तिने आघाडी घेतली; मात्र अखेरच्या काही क्षणामध्ये बिंगजियाओने झुंजार खेळ केला. तिने सलग दोन मॅच पॉइंट वाचवताना सिंधूवर कमालीचे दडपण आणले. मात्र, सिंधूने तिसºया प्रयत्नात नेटजवळ जबरदस्त नियंत्रित खेळ करताना बिंगजियाओला चूक करण्यास भाग पाडले आणि स्पर्धेत विजयी सलामी दिली.
दुसरीकडे, पुरुष गटात भारताच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या किदाम्बी श्रीकांतला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या व्हिक्टर एक्सेलसनविरुद्ध सलग दोन गेममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीपासून व्हिक्टरच्या वेगवान खेळापुढे पिछाडीवर पडलेल्या श्रीकांतला आपल्या पहिल्याच सामन्यात १३-२१, १७-२१ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)
- पहिल्या गेमच्या तुलनेत दुसºया गेममध्ये झुंजार खेळ करताना श्रीकांतने आशा उंचावल्या होत्या. मात्र ११-१२ अशा एका गुणाच्या आघाडीवर असलेल्या एक्सेलसनने जबरदस्त खेळ करताना आपली आघाडी १६-१३ अशी वाढवली.
यानंतर त्याने श्रीकांतवर अधिक दडपण आणत विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीकांतला गुरुवारी तैपईच्या चोऊ तिएन चेनविरुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावेच लागेल.