दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन ; सिंधूची फायनलमध्ये धडक, चीनच्या चेन युफायचा केला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 09:55 PM2017-12-16T21:55:14+5:302017-12-16T22:13:20+5:30
दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही सिंधूने अंतिम फेरीत धडक दिली आहे.
दुबई- दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही सिंधूने अंतिम फेरीत धडक दिली आहे. शनिवारी दुबईमध्ये झालेल्या उपात्य फेरीत सिंधूने चीनच्या चेन युफायचा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली. पी.व्ही सिंधूने चीनच्या चेन युफायचा 21-15 आणि 21-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. दुबईच्या शेख हमदान इंडोर स्टेडियममध्ये जवळपास एक तास हा सामना रंगला.
रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये सिंधूचा मुकाबला जपानच्या अकाने यामागुची हीच्याबरोबर होणार आहे. अकाने यामागुची थायलंडच्या रत्चानोक इंतानोनचा पराभव करून फायनलमध्ये पोहचली आहे. यामागुचीने रत्चानोकचा 17-21, 21-12, 21-19 असा पराभव केला. याच टुर्नामेंटमध्ये सिंधूने यामागुचीचा 21-9, 21-13 असा दणदणीत पराभव केला होता. त्यामुळे आता रविवारी होणाऱ्या फायनल मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सिंधू आणि युफाय चेन या आतापर्यंत सहावेळा आमनेसामने आल्या आहेत. त्यात सिंधूने चारवेळा, तर चेनने दोनवेळा बाजी मारली आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत सिंधूने चेनला हरविलं होतं.