कोरोनाच्या सावटातही सिंधूने घेतला होता ऑल इंग्लंड खेळण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 05:09 AM2020-03-21T05:09:36+5:302020-03-21T05:09:57+5:30
कोरोना प्रभावित देशांमधून सर्व भारतीयांनी मायदेशी परत यावे, असे आदेशही देण्यात आले होते. कोरोना विषाणूचा ज्या देशांत सर्वाधिक प्रभाव आहे त्यात इंग्लंडचाही समावेश आहे.
नवी दिल्ली : कोरोनामुळे भारत सरकारने प्रवासासंबंधी काही प्रतिबंध घातल्यानंतर पी. व्ही. सिंधू हिला आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेण्याचा पर्याय दिला होता. मात्र सिंधूने कोरोनाच्या सावटातही स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला. सरकारने ११ मार्च रोजी प्रवासासंबंधी निर्देश काढले होते. याअंतर्गत १५ एप्रिलपर्यंत सर्व व्हिसा रद्द करण्यात आले.
कोरोना प्रभावित देशांमधून सर्व भारतीयांनी मायदेशी परत यावे, असे आदेशही देण्यात आले होते. कोरोना विषाणूचा ज्या देशांत सर्वाधिक प्रभाव आहे त्यात इंग्लंडचाही समावेश आहे. सिंधूचे वडील पी.व्ही. रामन्ना म्हणाले, ‘११ मार्चच्या रात्री आम्हाला सूचना मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोपीचंद यांनी सामने खेळू नका, परत जाऊया, असे सुचवले. आमचे मत जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी सिंधू, लक्ष्य सेन, सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी दुसरी फेरी गाठली होती. आम्ही खेळण्याचे ठरविले.’ (वृत्तसंस्था)
सायना नेहवाल, पी. कश्यप आणि बी. साईप्रणीत हे पहिल्या फेरीत पराभूत झाले. लक्ष्य दुसºया फेरीत तर सिंधू उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाली. रामन्ना पुढे म्हणाले, ‘इंग्लंडमध्ये कुणी मास्क घालत नव्हते पण आम्ही घातले. आम्ही सर्व सावधगिरी बाळगली. केवळ जेवणाच्यावेळी मास्क काढायचो. पिण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करून गरम पाणी घेतले. सिंधू आणि मी भारतात येताच स्वत:ला वेगळे केले. आम्ही कुणाशी भेटत नाही. मोठी मुलगी घराजवळच राहते पण तिच्या घरीही गेलो नाही. सिंधू घराच्या छतावर सकाळचा व्यायाम करते आणि शेजारी जॉगिंग करते.’