गोव्याच्या अनुराची राष्ट्रीय शिबिरात निवड होईल - हिमांता बिसवा सरमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:13 PM2018-04-04T23:13:40+5:302018-04-04T23:13:40+5:30
गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय मानांकनात एकेरी आणि दुहेरीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गोव्याच्या अनुराची निवड राष्ट्रीय शिबिरासाठी होईल, असा विश्वास भारतीय बॅडमिंटन संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष हिमांता बिसवा सरमा यांनी व्यक्त केला आहे.
पणजी : गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय मानांकनात एकेरी आणि दुहेरीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गोव्याच्या अनुराची निवड राष्ट्रीय शिबिरासाठी होईल, असा विश्वास भारतीय बॅडमिंटन संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष हिमांता बिसवा सरमा यांनी व्यक्त केला आहे. कळंगुट येथे मंगळवारी भारतीय बॅडमिंटन संघटनेची निवडणूक झाली. त्यात आसामचे भाजप नेते हिमांता यांची बिनविरोध निवड झाली. नव्या कार्यकारिणीचा कालावधी २०१८-२०२२ असा असेल. या निवडणुकीनंतर हिमांता म्हणाले की, गोव्याची अनुरा सध्या देशात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे प्रत्येक वर्षी संघटना कोअर खेळाडूंची यादी पाठवत असते. मानांकनानुसार यादी बदलत असते. अनुराला मध्य सत्रात सहभागी होता आले नाही. आता एप्रिलमध्ये यादी निश्चित करण्यात येईल. त्यात तिचे नाव नक्की असेल, असेही त्यांनी सांगितले.
संघटनेच्या आमसभेत राष्ट्रीय तसेच अखिल भारतीय मानांकन स्पर्धेबाबतही निश्चित करण्यात आले. गोव्याला भारतीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद बहाल करण्यात आले. १३ वर्षांखालील सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे होतील. सबज्युनियर (१५ आणि १७ वर्षांखालील) राष्ट्रीय स्पर्धा बंगळुरू (कर्नाटक) येथे होतील. १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद लखनऊला बहाल करण्यात आले. वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा हैदराबाद येथे होतील. आमसभेत सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे सर्व राज्य संघटनांना या खेळाच्या विकासासाठी ५ लाखांचे आर्थिक अनुदान देण्यात येईल. याशिवाय राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसेही भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे दिली जातील.
दिल्लीचे अनुप नारंग यांची भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या कार्यालयीन प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली. आम्हाला अधिक अकादमी उभ्या कराव्या लागतील. राज्य सरकारने यासाठी मदत करायला हवी. अन्यथा संघटना अशा साधनसुविधा उभ्या करू शकणार नाहीत. पुढील ४ वर्षांचेध्येय निश्चित करण्यासाठी लवकरच कार्यकारी समितीची बैठक घेण्यात येईल, असे हिमांता यांनी सांगितले.
गोपीचंद मुख्य प्रशिक्षक
आमसभेत राष्ट्रीय प्रशिक्षक तसेच पद्मभूषण पुलेला गोपीचंद यांची पुढील ४ वर्षांसाठी वरिष्ठ गटासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. सध्या राष्ट्रकूल स्पर्धेच्या बॅडमिंटन पथकाचेही ते प्रमुख आहेत.छत्तीसगडचे संजय मिश्रा यांची ज्युनियर प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. गोपीचंद या खेळासाठी पूर्ण सकारात्मक असून संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल. या निवडीनंतर गोपीचंद म्हणाले, गेल्या काही वर्षांत या खेळात दर्जेदार खेळाडू मिळाले आहेत. तळागाळातून खेळाडू पुढे येत आहेत. कौशल्य आणि टॅलेंट या खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे या खेळाचे भविष्य उत्तम आहे.