अर्जुनसाठी गोपीने केली प्रणॉयच्या नावाची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 01:04 AM2020-06-22T01:04:55+5:302020-06-22T06:31:00+5:30
अर्जुनसाठी गोपीने केली प्रणॉयच्या नावाची शिफारस
नवी दिल्ली : मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी भारतीय खेळाडू एच.एस. प्रणॉयच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. कारण शिस्तभंगाच्या मुद्यामुळे भारतीय बॅडमिंटन महासंघाने (बीएआय) सलग दुसऱ्या वर्षी प्रणॉयच्या नावाकडे दुर्लक्ष केले. गोपीचंद यांनी ३ जून रोजी प्रणॉयच्या नावाची शिफारस केली. कारण खेलरत्न पुरस्कार विजेत्याला अशी शिफारस करण्याचा अधिकार आहे. नजीकच्या सूत्राने सांगितले की,‘गोपीचंद यांनी ३ जून रोजी प्रणॉयच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली. खेलरत्न पुरस्काराचे मानकरी गोपीचंद यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ही शिफारस केली. त्यांना शिस्तभंगाच्या मुद्याची माहिती नव्हती.’ शुक्रवारी प्रणॉयला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यात बीएआयविरुद्ध असलेल्या नाराजीबाबत १५ दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले आहे.
>प्रणॉयने काय म्हटले
२ जूनला बीएआयने सात्विक साईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी व समीर वर्मा यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी पाठविली होती. त्यानंतर प्रणॉयने टिष्ट्वटरवर आपली नाराजी व्यक्त केली होती. प्रणॉयने आता हे टिष्ट्वट डीलिट केले आहे. त्याने लिहिले होते की, ‘ही जुनी कथा आहे. राष्ट्रकुल स्पर्धा व आशियाई चॅम्पियनशिपमध्ये ज्या खेळाडूने पदके जिंकली, त्यांच्या नावाची शिफारस महासंघाने केली नाही आणि जे खेळाडू यापैकी कुठल्याही स्पर्धेत नव्हते त्यांच्या नावाची शिफारस केली. वाह, हा देश एक गंमत आहे.’