हाँगकाँग बॅडमिंटन : सायना, सिंधू, प्रणॉय यांची विजयी सलामी, कश्यप, सौरभचे आव्हान संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:08 AM2017-11-23T04:08:42+5:302017-11-23T04:08:56+5:30
कोलून : सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय या भारतीय स्टार शटलर्सनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना हाँगकाँग सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.
कोलून : सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय या भारतीय स्टार शटलर्सनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना हाँगकाँग सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी, अन्य लढतीत पारुपल्ली कश्यप आणि सौरभ वर्मा यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
लंडन आॅलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती सायनाने जागतिक क्रमवारीत ४४व्या स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या मेट्टे पोलसेन हिचा २१-१९, २३-२१ असा पाडाव करत विजयी सुरुवात केली. पुढील फेरीत सायनापुढे आठव्या मानांकीत चीनच्या चेन युफेईविरुद्ध लढेल. युफेईने आॅगस्ट महिन्यात झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पटकावले होते.
त्याचवेळी, रिओ आॅलिम्पिक रौप्य पदक विजेत्या सिंधूने शानदार विजयाची नोंद करताना हाँगकाँगच्या लियुंग युएत हिला २१-१८, २१-१० असे नमवले. सिंधूने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना लियुंगला पुनरागमनाची संधी दिली नाही. स्पर्धेच्या दुसºया फेरीत सिंधूपुढे जपानच्या आया ओहिरी किंवा रशियाच्या एवजेनिया कोसेत्स्काया यांच्यातील एका खेळाडूविरुद्ध खेळेल.
पुरुष गटात मात्र भारतला संमिश्र यश मिळाले. तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात प्रणॉयने झुंजार विजय मिळवताना हाँगकाँगच्या हू युन याचे कडवे आव्हान १९-२१, २१-१७, २१-१५ असे परतावले. पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर प्रणॉयने जबरदस्त पुनरागमन करताना युनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. पुढील फेरीत प्रणॉय जपानच्या काजुमासा सकाइविरुद्ध खेळेल. नुकताच झालेल्या इंडोनेशिया ओपन सुपर सिरिजच्या उपांत्य फेरीत प्रणॉयने सकाइला नमवले होते.
दुसरीकडे, राष्ट्रकुल स्पर्धेचा विजेता कश्यपला पहिल्याच फेरीत कोरियाच्या ली डोंग कियूनविरुद्ध २१-१५, ९-२१, १९-२१ असे पराभूत व्हावे लागले. पहिला गेम जिंकून आघाडी घेतलेल्या कश्यपला सातत्य कायम राखण्यात अपयश आले. तसेच, सौरभ वर्माही पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोकडून १५-२१, ८-२१ असा पराभूत झाला. (वृत्तसंस्था)
>महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा - एन सिक्की रेड्डी यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. अश्विनी - रेड्डी यांना चीनच्या हुआंग डोंगपिंग - ली वेनमेइ यांनी २१-११, १९-२१, २१-१९ असे नमवले.