ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीची आशा - गोपीचंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 02:59 AM2020-01-04T02:59:51+5:302020-01-04T06:52:44+5:30
नवी दिल्ली : पी.व्ही. सिंधूसह आघाडीचे बॅडमिंटनपटू सध्या फॉर्ममध्ये नसले, तरी राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले ...
नवी दिल्ली : पी.व्ही. सिंधूसह आघाडीचे बॅडमिंटनपटू सध्या फॉर्ममध्ये नसले, तरी राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे.
गोपीचंद म्हणाले, ‘मागील काही ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी चांगली झाली. यंदा आमच्या संघात पी. व्ही. सिंधूच्या रुपाने एक विश्व विजेतीदेखील आहे. यामुळेच चांगल्या तयारीच्या जोरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी घडेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.’ गेल्यावर्षी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू सिंधूने जपानची नोजोमी ओकुहाराचा पराभव करीत जेतेपद पटकावले होते.
त्याआधी ‘फुलराणी’ सायना नेहवालने लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्य आणि सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.
यावेळी पी. गोपीचंद यांनी भारत सरकारच्या वतीने युवा खेळाडूंसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या क्रीडा महोत्सवाचेही कौतुक केले. ‘अशा प्रकारच्या महोत्सवात युवा खेळाडूंना चांगले व्यासपीठ लाभल्याने खेळांसाठी आश्वासक चित्र तयार होते. येथे मिळालेला अनुभव कारकिर्दीत मोलाचा ठरतो,’ असे मत गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे. खेलो इंडिया महोत्सवाचे आयोजन १० ते २२ जानेवारीदरम्यान गुवाहाटी येथे होईल. (वृत्तसंस्था)