व्यस्त वेळापत्रकाचा कामगिरीवर परिणाम- पुलेल्ला गोपीचंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 03:55 AM2019-11-13T03:55:08+5:302019-11-13T03:55:15+5:30
‘आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांचे वेळापत्रक आव्हानात्मक असल्याने खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही.
मुंबई : ‘आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांचे वेळापत्रक आव्हानात्मक असल्याने खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही. याचाच परिणाम भारतीय खेळाडूंवर होत असून केवळ भारतीयच नाही, तर विदेशी खेळाडूही महत्त्वाच्या स्पर्धांतून माघार घेत आहेत,’ असे वक्तव्य भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी व्यक्त केले.
मुंबईत मंगळवारी आघाडीची विमा कंपनी व खेलो मोअर यांच्या संयुक्त विद्यमानाने फुटबॉल मॅनिया उपक्रमाचे गोपीचंद यांच्या उपस्थितीत अनावरण झाले. यावेळी गोपीचंद म्हणाले, ‘गतवर्षीचे वेळापत्रक आव्हानात्मक होते. त्यानंतरही सिंधूने जागतिक विजेतेपद पटकावले. यानंतरही तिला एका आठवड्यामागून एक अनेक स्पर्धा खेळाव्या लागल्या. डेन्मार्क, कोरिया, चीन व आता हाँगकाँग अशा एकामागून एक स्पर्धा खेळणे अत्यंत आव्हानात्मक असते. या धावपळीचा अनेक भारतीयांच्या कामगिरीवर परिणाम झाला.’
>आघाडीच्या खेळाडूंचा अपवाद वगळता इतर खेळाडूंकडे फार गांभिर्याने लक्ष दिले गेले नाही. आता भारतीय बॅडमिंटन संघटनेने पुढाकार घेतला आहे. साई व टॉप्स योजनेअंतर्गत दुसऱ्या फळीतील खेळाडूंकडेही लक्ष देण्यात येत आहे. दुहेरीतही आपल्याकडे मोठी गुणवत्ता आहे. या सर्व प्रयत्नांचे सात्विक-चिराग ही जोडी सर्वोत्तम उदाहरण आहे. - पी. गोपीचंद