भारतीय संघ आता केवळ एक-दोन खेळाडूंवर अवलंबून नाही - पी. गोपीचंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 02:50 AM2018-04-18T02:50:43+5:302018-04-18T02:50:43+5:30
भारतीय संघ आता केवळ एक-दोन खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून नसून भारतीय बॅडमिंटनला आता खोली प्राप्त झाली आहे, अशा शब्दांत मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटनची प्रशंसा केली.
हैदराबाद : भारतीय संघ आता केवळ एक-दोन खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून नसून भारतीय बॅडमिंटनला आता खोली प्राप्त झाली आहे, अशा शब्दांत मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटनची प्रशंसा केली.
आॅस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावण्याव्यतिरिक्त बॅडमिंटनमध्ये आणखी पाच पदके पटकावली.
सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीबाबत बोलताना गोपीचंद म्हणाले की, राष्ट्रकुलसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची अंतिम लढत दोन भारतीय खेळाडूंदरम्यान रंगली, ही अभिमानाची बाब आहे.’
महिला एकेरीचे सुवर्णपदक जिंकणाऱ्या सायनाने सांघिक स्पर्धा जिंकणे अधिक समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. सायना म्हणाली, ‘माझ्यासाठी वैयक्तिक बाब अधिक महत्त्वाची नाही. पण, सांघिक स्पर्धेतील यश महत्त्वाचे आहे. चमकदार कामगिरीसाठी दुहेरीतील खेळाडूंची प्रशंसा करते. त्यामुळे एकेरीतील खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली.’
‘या वेळी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असले तरी खूश
आहे; पण भविष्यात यापेक्षा सरस कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहील,’ असे सिंधू म्हणाली. महिला एकेरीच्या अंतिम लढतीबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सायना म्हणाली, ‘निश्चितच तुम्ही ओळखत असलेल्या खेळाडूविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असते.’ (वृत्तसंस्था)
सांघिक स्पर्धेतील सुवर्णपदकाबाबत कधी विचार केला गेला नव्हता. संघाच्या कामगिरीमुळे हे शक्य झाले. गेल्या ३०-४० वर्षांत अनेकदा संघात केवळ एक-दोन खेळाडू मजबूत होते; पण आता स्थिती वेगळी आहे. आता संघातील प्रत्येक खेळाडू योगदान देत आहे.
- गोपीचंद
सिंधूचा प्रतिहल्ला कमकुवत : विमल कुमार
नवी दिल्ली: भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू प्रतिहल्ला करताना कमकुवत भासते त्यामुळेच राष्टÑकूल सहित अनेक महत्वाच्या स्पर्धेतील अंतिम फेरीत तिला पराभव पत्करावा लागला, असे मत माजी प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,‘ अंतिम सामन्यात सिंधू आक्रमक नव्हती. जेव्हा मोठी रॅली होते तेंव्हा सिंधू कमकुवत भासते. याचा नेमका फायदा सायनाने उठवला. सिंधू अजून तरुण आहे. परिपक्वता आल्यानंतर तिच्या खेळात नक्कीच सुधारणा होईल असे ते म्हणाले.