इंडिया ओपन बॅडमिंटन डिसेंबरमध्ये; बीडब्ल्यूएफने जाहीर केले सुधारित वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 05:17 AM2020-05-23T05:17:09+5:302020-05-23T05:20:02+5:30
बीडब्ल्यूएफच्या वृत्तानुसार विश्व टूर सुपर ५०० स्पर्धा आधी २४ ते २९ मार्च या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार होती. आता हे आयोजन ८ ते १३ डिसेंबरदरम्यान केले जाईल.
नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे स्थगित करण्यात आलेली इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा ही आॅलिम्पिक पात्रता फेरी ८ ते १३ डिसेंबर या कालावधीत भारतात आयोजित होणार आहे. विश्व बॅडमिंटन महासंघाने(बीडब्ल्यूएफ) कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
बीडब्ल्यूएफच्या वृत्तानुसार विश्व टूर सुपर ५०० स्पर्धा आधी २४ ते २९ मार्च या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार होती. आता हे आयोजन ८ ते १३ डिसेंबरदरम्यान केले जाईल. या स्पर्धेपूर्वी ११ ते १६ आॅगस्टदरम्यान हैदराबाद ओपन तसेच १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान सय्यद मोदी आंतरराष्टÑीय स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
याशिवाय आठ स्पर्धांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. त्यात न्यूझीलंड ओपन, इंडोनेशिया ओपन, मलेशिया ओपन, थायलंड ओपन तसेच चायना विश्व टूर फायनल्सचा समावेश आहे. बीडब्ल्यूएफ महासचिव थॉमस लुंड म्हणाले, ‘बॅडमिंटन सुरू करण्याची योजना बनविणे कठीण काम होते. कमी वेळेत अनेक स्पर्धांचे आयोजन होणार आहे. तरीही सुरक्षित खेळ आयोजनावर आम्ही भर देऊ अशी खात्री आहे. एका देशातील खेळाडू दुसऱ्या देशात केव्हा प्रवास करू शकतील, हे सांगणे कठीण असले तरी प्रवास निर्बंध संपण्याआधी आमचे वेळापत्रक तयार असायला हवे.’(वृत्तसंस्था)