इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधू, सायनाची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:15 AM2018-02-01T01:15:56+5:302018-02-01T01:16:32+5:30
पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या भारताच्या स्टार खेळाडूंनी अपेक्षित कामगिरीसह इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी, पायाची दुखापत कायम असतानाही सामना खेळलेल्या एच. एस. प्रणॉय याला पहिल्याच फेरीत मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले.
नवी दिल्ली : पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या भारताच्या स्टार खेळाडूंनी अपेक्षित कामगिरीसह इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी, पायाची दुखापत कायम असतानाही सामना खेळलेल्या एच. एस. प्रणॉय याला पहिल्याच फेरीत मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले.
सायनाने सहज विजय मिळवताना डेन्मार्कच्या सोफी डहल हिला २१-१५, २१-९ असे पराभूत केले. पहिल्या गेममध्ये थोडीफार चुरस पहायला मिळाल्यानंतर सायनाने दुसºया गेममध्ये एकतर्फी खेळ करताना सोफीला संधी दिली नाही. सायनाच्या वेगवान खेळापुढे तिचा काहीच निभाव लागला नाही. त्याचप्रमाणे, सिंधूनेही एकतर्फी झालेल्या सामन्यात सहज विजय मिळवताना डेन्मार्कच्याच नतालिया कोच रोड हिचा २१-१०, २१-१३ असा धुव्वा उडवला. सिंधूने वेगवान स्मॅश आणि नेट्सजवळील अप्रतिम नियंत्रणाच्या जोरावर नतालियाला फारवेळ टिकू दिले नाही.
पुरुषांच्या गटात मात्र जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या (बीडब्ल्यूएफ) नव्या नियमांचा परिणाम दिसू लागला आहे. नव्या नियमानुसार जागतिक क्रमवारीतील अव्वल १५ खेळाडूंना प्रमुख १५ स्पर्धांपैकी १२ स्पर्धा खेळणे अनिवार्य असल्याने प्रणॉयला पायाला दुखापत असतानाही या स्पर्धेत खेळावे लागले. याचा फटका त्याला पहिल्याच फेरीत बसला. भारताच्याच श्रेयांश जयस्वालविरुद्ध खेळताना प्रणॉय सुरुवातीपासून झगडताना दिसला. खेळताना येत असलेल्या अडचणीमुळे अखेर प्रणॉयला पहिल्याच फेरीत ४-२१, ६-२१ असा पराभव पत्करावा लागला. मलेशिया आणि इंडोनेशिया येथे झालेल्या पहिल्या दोन सुपर स्पर्धांमध्ये सहभागी न झाल्यानंतर इंडिया ओपनमध्ये खेळणे प्रणॉयसाठी अनिवार्य बनले होते.
याविषयी प्रणॉय म्हणाला की, ‘कमीत कमी १२ स्पर्धा खेळण्याच्या ‘बीडब्ल्यूएफ’ नव्या नियमामुळे मला इंडिया ओपन स्पर्धा खेळावी लागली. शिवाय पहिल्या फेरीतील प्रतिस्पर्धी माझ्याच देशाचा असल्याने मी सामन्यातून माघारही घेऊ शकत नव्हतो. कारण असे केले असते, तर नव्या नियमानुसार मला आणि माझ्या देशाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूलाही गुण मिळाला नसता.’ (वृत्तसंस्था)
यामुळे केवळ स्पर्धा राहतील...
नव्या नियमानुसार सध्याचे वेळापत्रक खेळाडूंसाठी खूप कठीण आहे. माझ्यामते यामध्ये स्पर्धांची संख्या कमी करण्यात आले पाहिजे. मी प्रायोजक आणि आर्थिक बाजू समजू शकते. पण यामुळे खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयशी ठरला नाही पाहिजे. यामुळे आपल्याकडे केवळ स्पर्धा राहतील, पण चॅम्पियन मिळणार नाही. दीर्घ काळापर्यंत खेळण्यासाठी आम्हाला तंदुरुस्त रहावे लागेल आणि यंदाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. - सायना नेहवाल