इंडिया ओपन : संधूला पराभवाचा धक्का, बेईवान बनली चॅम्पियन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 08:55 PM2018-02-04T20:55:43+5:302018-02-04T20:56:11+5:30
गतविजेती आणि अग्रमानांकित भारताची शटलर पी.व्ही. सिंधू हिला पराभूत करत अमेरिकन खेळाडू बेईवान झेंग हिने इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले आहे.
नवी दिल्ली : गतविजेती आणि अग्रमानांकित भारताची शटलर पी.व्ही. सिंधू हिला पराभूत करत अमेरिकन खेळाडू बेईवान झेंग हिने इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले आहे. दिल्लीतील सिरी फोर्टमध्ये झालेल्या या सामन्यात सिंधूला २१-१८, ११-२१,२२-२० असा पराभव पत्करावा लागला. ६९ मिनिटे चाललेल्या या सामन्यातील पराभवाने पी.व्ही. सिंधू ही सलग दुस-यांदा इंडिया ओपनचे विजेतेपद पटकवण्यात अपयशी ठरली. तर बेईवान हिने पहिल्यांदाच सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावले आहे. या आधी बेईवान हिने २०१६ मध्ये फे्रंच ओपनची उपांत्य फेरी गाठली होती. ही तिची सुपर सिरीजमधील सर्वोत्तम कामगिरी होती. बेईवान आणि सिंधू यांच्यात आतापर्यंत चार लढती झाल्या आहेत. त्यात सिंधूने दोन तर बेईवान हिने दोन लढती जिंकल्या.
दोन्ही खेळाडूंमध्ये आज फारसे अंतर नव्हते. मात्र बेईवानने स्मॅश आणि कोर्ट कव्हरेजमधील चांगल्या स्थितीमुळे विजय मिळवला. तिने नेटजवळ येऊन देखील काही चांगले शॉट लगावले.