भारतीय पथकाचे नेतृत्व पी.व्ही. सिंधूकडे, आयओएने दिला बहुमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 05:29 AM2018-03-25T05:29:28+5:302018-03-25T05:29:28+5:30
आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत आयोजित राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व दिग्गज बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू करणार आहे.
नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत आयोजित राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व दिग्गज बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू करणार आहे. राष्टÑकुलच्या उद्घाटन सोहळ्यात सिंधू भारताची ध्वजवाहक असेल. भारतीय आॅलिम्पिक संघटनेने हा बहुमान सिंधूला दिला.
२०१६ च्या रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती असलेल्या सिंधूकडे ही जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती आयओएने दिली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूकडून राष्टÑकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. ग्लास्गो राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सिंधूने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते. पिस्तूल नेमबाज विजय कुमार याला २०१४ च्या राष्टÑकुलचा आणि २००८चा आॅलिम्पिक चॅम्पियन नेमबाज अभिनव बिंद्रा याला २०१० च्या नवी दिल्ली राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचा भारतीय ध्वजवाहक बनविण्यात आले होते. मेलबोर्न राष्टÑकुल स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात आॅलिम्पिक पदक विजेते असलेले राज्यवर्धनसिंग राठोड यांना हा बहुमान मिळाला. राठोड हे सध्या क्रीडामंत्री आहेत.
वर्षभरातील सिंधूची विश्व बॅडमिंटनमधील कामगिरी पाहता आॅलिम्पिक संघटनेने सायना नेहवाल आणि मेरी कोम या सिनियर खेळाडूंना वगळून सिंधूला हा बहुमान दिला. सायना नेहवाल आणि मेरी कोम यांची ही दुसरी राष्ट्रकुल स्पर्धा असणार आहे. मात्र या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याचा मान मिळालेला नाही. भारतीय पथकाचे नेतृत्व करण्यासाठी सिंधूची झालेली निवड ही कामगिरीच्या आधारावर झाली असल्याचे आयओएने स्पष्ट केले आहे.(वृत्तसंस्था)