सिंधूच्या 'रुपेरी' यशाने 'त्याला' मिळाली प्रेरणा, आता 'लक्ष्य' ऑलिम्पिक सुवर्ण!
By स्वदेश घाणेकर | Published: December 20, 2018 01:27 PM2018-12-20T13:27:15+5:302018-12-20T13:36:28+5:30
भारतीय बॅडमिंटनपटूची कामगिरी दिवसेंदिवस बहरत चालली आहे. सायना नेहवालचे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक, पी. व्ही. सिंधूचे वर्ल्ड टूर फायनल्समधील ऐतिहासिक जेतेपद, समीर वर्मा, अजय जयराम, श्रीकांत किदम्बी पुरूष एकेरीतील ही त्रिकुटही जागतिक स्पर्धांत दबदबा गाजवत आहेत.
मुंबई : भारतीय बॅडमिंटनपटूची कामगिरी दिवसेंदिवस बहरत चालली आहे. सायना नेहवालचे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक, पी. व्ही. सिंधूचे वर्ल्ड टूर फायनल्समधील ऐतिहासिक जेतेपद, समीर वर्मा, अजय जयराम, श्रीकांत किदम्बी पुरूष एकेरीतील ही त्रिकुटही जागतिक स्पर्धांत दबदबा गाजवत आहेत. या वरिष्ठ खेळाडूंच्या पावलावर पाऊल टाकत ज्युनिअर्सही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पराक्रम करताना दिसत आहेत आणि वरिष्ठ खेळाडूंचे प्रत्येक पदक हे भारताच्या भविष्यातील ताऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लक्ष्य सेन हा युवा खेळाडूही या प्रेरणेतून वाटचाल करत आहे. लक्ष्यने नुकतेच जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्य, जागतिक स्पर्धेतील कांस्य आणि टाटा ओपन आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या बंगळूरूच्या या खेळाडूला ऑलिम्पिकचे सुवर्णपदक खुणावत आहे.
युवा जागतिक स्पर्धेतील कांस्यपदकाने लक्ष्यचे मनोबल कमालीचे उंचावले आहे. तो म्हणाला,"जागतिक पदकाने मला आणखी उंच भरारी घेण्याचे बळ दिले आहे. ही सुरुवात आहे आणि मला आणखी लांबचा पल्ला गाठायचा आहे. पदक पटकावल्याचा आनंद आहे, परंतु मला त्यातच रमून राहायचे नाही. आजच्यापेक्षा चांगली कामगिरी कशी करता येईल यासाठी प्रचंड मेहनत मला घ्यायची आहे. अनेक पदकं आणि अनेक स्पर्धांची जेतेपदं जिंकायची आहेत."
या आत्मविश्वासामगचं रहस्य सांगताना लक्ष्य प्रशिक्षक, आई-वडील यांच्यासोबत वरिष्ठ खेळाडू यांना श्रेय देतो. "हे वर्ष सीनियर खेळाडूंनी गाजवलं. माझ्यासारखा युवा या खेळाडूंच्या कामगिरीने प्रेरित होत असतो. वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यांचे प्रत्येक पदक हे येणाऱ्या पिढीला ऊर्जा देणारे आहे. पीबीएलमध्ये भारताच्या आणि परदेशातील अशाच वरिष्ठ खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. त्यांचे खेळातील तंत्र मला फार फायदेशीर ठरते, " असे पुणे 7 एस संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लक्ष्यने सांगितले.
भारतात युवा बॅडमिंटनपटूंची मजबूत फळी तयार होत आहे आणि त्यांची कामगिरीही उल्लेखनीय होत आहे. पी. व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून युवकांसमोर आदर्श ठेवला आहे. तिच्यामुळेच ऑलिम्पिकपदक जिंकण्याची मला प्रेरणा मिळाली आहे, असे लक्ष्यने सांगितले.