मलेशियाला नमवून बाद फेरीचे भारताचे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 04:57 AM2019-05-21T04:57:37+5:302019-05-21T04:57:40+5:30
सुदीरमन कप बॅडमिंटन; सिंधू, सायना, श्रीकांत यांच्यावर मदार
नानिंग (चीन) : भारतीय बॅडमिंटनपटू सुदीरमन कप बॅडमिंटन स्पर्धेत मंगळवारपासून ड गटात मलेशियाच्या युवा खेळाडूविरुद्ध लढत देणार आहे. हा सामना जिंकून बाद फेरी गाठण्याचे आव्हान भारतीय संघापुढे आहे.
मलेशिया दिग्गज ली चोंग वेई याच्या अनुपस्थितीत कोर्टवर उतरणार असून भारतासाठी ही चांगली संधी राहील. भारत पराभूत झाल्यास चीनविरुद्ध पुढचा सामना त्यांच्यासाठी ‘करा किंवा मरा’ असा असेल. चीनने मलेशियावर ५-० ने मात केली असल्याने भारताकडून पराभूत होताच मलेशिया स्पर्धेबाहेर होईल.
भारताने २०११ व २०१७ मध्ये या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. भारतीय संघाला स्पर्धेत आठवे मानांकन मिळाले असून मिश्र प्रकारात पदक मिळवून देण्याची जबाबदारी एकेरीत खेळणाऱ्यांवर असेल. यामध्ये पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत व समीर वर्मा यांचा समावेश आहे.
महिला एकेरीत गोह जिन वेई तसेच सानिया चेअह या मलेशियाचे प्रतिनिधित्व करणार असून पुरुष एकेरीत ली झी जियावर जबाबदारी आहे. दुहेरीत सात्विक साईराज परतल्याने पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीत भारतीय संघ भक्कम झाला आहे. साईराज पुरुष दुहेरीत चिराग शेट्टीसह, तर मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पाच्या सोबतीने लढेल. (वृत्तसंस्था)