'सुवर्णकन्या' सिंधू भारताची शान; पंतप्रधान मोदींकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 02:52 PM2019-08-27T14:52:23+5:302019-08-27T14:52:59+5:30
सुवर्णरत्न पी. व्ही. सिंधूनं नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
नवी दिल्ली : सुवर्णरत्न पी. व्ही. सिंधूनं नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. 2017 व 2018 मध्ये अंतिम फेरीत धडक मारूनही सिंधूला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. पण, यंदा सुवर्णपदकाशिवाय माघारी जायचं नाही, या ठाम निर्धाराने ती कोर्टवर उतरली. 40 मिनिटांहून कमी कालावधीत सिंधूनं जापानच्या नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा पराभव करून इतिहास घडवला. तिच्या या विक्रमी कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक झाले. सुवर्णपदकासह मायदेशात परतलेल्या सिंधूची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. सिंधू तू भारताची शान आहेस, असे गौरोद्गार मोदींनी उच्चारले.
मोदी म्हणाले की,''भारताची शान, भारताला सुवर्णक्षणाचा साक्षीदार बनवणाऱ्या पी. व्ही. सिंधूला भेटून आनंद झाला. तिचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.''
#WATCH: Shuttler PV Sindhu meets PM Narendra Modi in Delhi; Sindhu won a gold medal at the BWF World Championships on August 25. pic.twitter.com/RYR1hAWswL
— ANI (@ANI) August 27, 2019
सिंधूनं 2013 व 2014 मध्ये कांस्यपदक जिकंले, तर 2017 व 2018मध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 2017च्या अंतिम सामन्यात ओकुहाराकडूच भारतीय खेळाडूला पराभव पत्करावा लागला होता. या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली.
या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताने आतापर्यंत 1 सुवर्ण, 3 रौप्य व 6 कांस्यपदकांसह एकूण 10 पदकांची कमाई केली आहे. त्यापैकी पाच पदकं सिंधूच्या नावावर आहेत.
तत्पूर्वी, सिंधू आणि मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांनी क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली. रिजिजू यांनी सिंधूला 10 लाखांचा धनादेश बक्षीस म्हणून दिला. यावेळी बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष हिमंता बिस्वा शर्मा, प्रशिक्षक गोपिचंद आमि किम जी-ह्यून, सिंधूचे वडील पी व्ही रमण हेही उपस्थित होते.
याच स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या बी साई प्रणिथलाही क्रीडा मंत्रालयाने 4 लाखांचा धनादेश दिला.
सुवर्ण'सिंधू'; जागतिक स्पर्धेत जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय
सुवर्णपदक जिंकून सिंधूनं आईला दिलं बर्थ डे गिफ्ट
याची देही याची डोळा, पाहा 'सुवर्णसिंधू'च्या ऐतिहासिक विजयाचा सोहळा
ऑगस्ट महिना सिंधूसाठी आहे लकी; पाहा ही थक्क करणारी कामगिरी
जगज्जेत्या पी.व्ही. सिंधूला घरातूनच मिळाले बाळकडू; जाणून घ्या, तिच्या प्रवासाबद्दल...