इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सिंधू, सायना, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 03:01 AM2019-01-25T03:01:19+5:302019-01-25T03:01:23+5:30
भारताची पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी गुरुवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
जकार्ता : भारताची पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी गुरुवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या मानांकित सिंधूने स्थानिक खेळाडू ग्रेगोरिया मारिस्का टीचा ३७ मिनिटांमध्ये २३-२१, २१-७ ने पराभव केला, तर किदाम्बी श्रीकांतनेही अंतिम आठमध्ये स्थान निश्चित केले. सिंधूने गेल्यावर्षी राष्ट्रकुल स्पर्धा, विश्व चॅम्पियनशिप आणि आशियन गेम्समध्ये रौप्यपदक पटकावण्याव्यतिरिक्त गेल्यावर्षी विश्व टूर फायनलमध्ये जेतेपद पटकावले. पुढच्या फेरीत सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मारिनच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
लंडन आॅलिम्पिकच्या कांस्यपदक विजेत्या सायनाने इंडोनेशियाच्या फिररियानीचा २१-१७, २१-१५ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायनाचा फितरियानीविरुद्ध हा पाचवा विजय आहे. आठवे मानांकन प्राप्त श्रीकांतने आशियन गेम्सचा कांस्यपदक विजेता केंटा निशिमोतोचा २१-१४, २१-९ ने पराभव केला. गेल्या आठवड्यात मलेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाºया श्रीकांतला आता इंडोनेशियाचा आशियन गेम्स चॅम्पियन जोनाथन क्रिस्टी किंवा चीनचा आॅल इंग्लंड चॅम्पियन शि युकी यांच्यापैकी एकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
मनू अत्री व बी. सुमित रेड्डी या पुरुष दुहेरीच्या जोडीला किम अस्ट्रूप व एंडर्स स्कारूप रासमुसेन या पाचव्या मानांकित जोडीविरुद्ध १४-२१, २१-१७, १०-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या लढतीत माजी आॅलिम्पिक चॅम्पियन ली शुरुईचा पराभव करणाºया सिंधूने आपल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध ५-० ची कामगिरी कायम राखली. (वृत्तसंस्था)