सिंधू, पी. कश्यपची विजयी सलामी, एच. एस. प्रणॉयचे आव्हान मात्र संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 01:04 AM2017-09-14T01:04:21+5:302017-09-14T01:05:04+5:30
भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधूने अपेक्षित कामगिरी करताना कोरिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे, पुरुष गटात पी. कश्यपने आपल्या लढतीत बाजी मारताना विजयी सुरुवात केली. मात्र, अन्य लढतीत भारताला मोठा धक्का बसला. कसलेल्या एच. एस. प्रणॉय याला पहिल्याच फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.
सोल : भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधूने अपेक्षित कामगिरी करताना कोरिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे, पुरुष गटात पी. कश्यपने आपल्या लढतीत बाजी मारताना विजयी सुरुवात केली. मात्र, अन्य लढतीत भारताला मोठा धक्का बसला. कसलेल्या एच. एस. प्रणॉय याला पहिल्याच फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.
महिला एकेरीत सिंधूने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना जागतिक क्रमवारीत १७ व्या स्थानी असलेल्या हाँगकाँगच्या चेउंग नगान हिला सरळ दोन गेममध्ये २१-१३, २१-८ असे नमविले. सहजपणे आगेकूच केलेल्या सिंधूचा पुढील सामन्यात थायलंडच्या नितचाओन जिम्दापोलविरुद्ध सामना होईल.
पुरुष एकेरीत अनुभवी खेळाडू कश्यपने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना चीनी तैपईच्या सु जेन हाओ याचे आव्हान २१-१३, २१-१६ असे संपुष्टात आणले. कश्यपला पुढच्या फेरीत अव्वल मानांकित कोरियाच्या सोन वॅन हो याच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. याआधी कश्यपने पात्रता फेरीत सलग दोन सामने जिंकताना मुख्य फेरीत धडक मारली होती. अन्य लढतीत मात्र भारताला अनपेक्षित निकालाला सामोरे जावे लागले. पदकाच्या शर्यतीत दावेदार असलेल्या प्रणॉयला पहिल्याच फेरीत हाँगकाँगच्या लाँग एंगस याने पराभूत केले. एक तास पाच मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात एंगसने मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना प्रणॉयची झुंज २१-१७, २१-२३, २१-१४ अशी संपुष्टात आणली. पुरुष दुहेरीतही भारताच्या पदरी निराशा आली. मनु अत्री - बी. सुमित रेड्डी यांना सलामीलाच कोरियाच्या चुंग इयु सोएक - किम डुक योंग यांच्याविरुद्ध सरळ दोन गेममध्ये ११-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)
प्रणव, सिक्की रेड्डी यांचे आव्हान संपुष्टात
मिश्र दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. सात्विक साईराज रंकीरेड्डी - अश्विनी पोनप्पा यांना पहिल्या फेरीत तांग चुन मान - तसे यिंग सुएत या हाँगकाँगच्या जोडीने २१-१८, २१-१९ असे नमवले. दुसरीकडे, प्रणव चोप्रा - एन. सिक्की रेड्डी यांचा इंडोनेशियाच्या प्रवीण जॉर्डन - डेबी सुसांतो यांच्याविरुद्ध २१-१३, १९-२१, १५-२१ असा पराभव झाला.