विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सायना नेहवाल पराभूत; अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 07:52 PM2017-08-26T19:52:56+5:302017-08-26T22:06:56+5:30
ग्लास्गोमध्ये झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमच्या उपांत्य फेरीत भारताची फुलराणी सायना नेहवालला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे
ग्लास्गो, दि. 26- ग्लास्गोमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमधील उपांत्य फेरीत भारताची फुलराणी सायना नेहवालला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. जपानच्या नोजोमी ओकुहाराविरुद्ध झालेल्या या स्पर्धेमध्ये सायना नेहवालला पराभवाला सामोर जावं लागलं. त्यामुळे आता सायनाला कास्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. नोजोमीने 12-21, 21-17, 21-10 अशा सरळ सेटमध्ये सायनाचा पराभव केला. त्यामुळे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सायना विरूद्ध सिंधू असा सामना पाहण्याचं भारतीयांचं स्वप्न भंगलं आहे. उपांत्यपूर्व फेरीत ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला पराभवाचा धक्का देणाऱ्या ओकुहाराने दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये जबरदस्त खेळ केला. पहिला गेम अगदी आरामात जिंकणाऱ्या सायनाचा त्यानंतर ओकुहारासमोर निभाव लागला नाही.
पहिला गेममध्ये चांगला खेळ करणारी सायना दुसऱ्या गेममध्ये पिछाडीवर होती. १० सुपर सीरिज विजेत्या सायनाला ४ सुपर सीरिज विजेत्या ओकुहाराने कडवी झुंज दिली. सुरुवातीला ४-१ अशा पिछाडीवर पडलेल्या सायनाने त्यानंतर १०-१० आणि १५-१५ अशी बरोबरी साधली. मात्र त्यानंतर ओकुहाराने फॉर्म बदलत दुसरा गेम २७ मिनिटांमध्ये जिंकत सामना बरोबरीत आणला.
तिसऱ्या गेममध्ये सायनाची कसोटी लागली होती. जागतिक क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असलेली ओकुहारा या गेममध्ये सरस ठरली. थकव्यामुळे सायनाला फारसा प्रतिकार करता आला नाही. हा गेम ओकुहाराने २१-१० असा सहज जिंकला. त्यामुळे सायनाचं आव्हान संपुष्टात आलं. आता दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याकडे सगळ्यांचा लक्ष लागलं आहे. या सामन्यात पी. व्ही. सिंधूचा सामना चीनच्या चेन युफेईशी होणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीत सायनाने स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिलमौरचा केला पराभव
सायना नेहवाल हिने विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिलमौरचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. याआधी रिओ ऑलिम्पिकची पदक विजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने सुद्धा उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत सायना नेहवाल हिचा स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिलमौर विरुद्ध सामना झाला. यामध्ये सायना नेहवालने क्रिस्टी गिलमौर हिचा 21-19, 18-21, 21-15 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता उपांत्य फेरीत सायना नेहवाल आणि नोजोमि ओकुहारा यांच्यात लढत झाली. त्याआधी रिओ ऑलिम्पिकची पदक विजेती सिंधूने विश्व क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली चीनची सून यू हिच्यावर सरळ सेटमध्ये विजय नोंदवित किमान कांस्य पदक निश्चित केलं. 2013 आणि 2014 मध्ये कांस्य जिंकणा-या 22 वर्षांच्या सिंधूने शुक्रवारी 39 मिनिटांत 21-14, 21-9 अशा फरकाने विजय साजरा केला. विश्व क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सिंधूची उपांत्य फेरीत दहाव्या स्थानावर असलेली चीनची चेन युफेईविरुद्ध गाठ पडणार आहे. युफेईने थायलंडची माजी चॅम्पियन रतनचोक इंतानोन हिच्यावर विजय नोंदविला