सिंधू-सायना पाठोपाठ जपान ओपन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणयचे आव्हान संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 02:37 PM2017-09-22T14:37:46+5:302017-09-22T15:03:00+5:30
किदाम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणय यांना शुक्रवारी जपान ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
टोकियो - भारताच्या किदाम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणय यांचे शुक्रवारी जपान ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. काल गुरुवारी पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांचे आव्हान संपुष्टात आले होते. श्रीकांत आणि प्रणयला प्रतिस्पर्धी खेळाडूंनी सरळ गेममध्ये पराभूत केले.
45 मिनिट चाललेल्या सामन्यात चीनच्या शी युगूने प्रणयचा 15,21, 14-21 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये 20-13 अशी स्थिती असताना प्रणयने सलग दोन गुण घेतले. पण युगूने गेम पाँईट घेत पहिला गेम जिंकला. दुस-या गेममध्ये प्रणयने चांगली सुरुवात केली होती. दोघेही 5-5 असे बरोबरीत होते. पण त्यानंतर युगूने कामगिरी उंचावत प्रणयला पिछाडीवर टाकले व दुसरा गेम 14-21 ने जिंकत दिमाखात उपांत्यफेरीत प्रवेश केला.
प्रणयने याआधीच्या सामन्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवत तिस-या फेरीत प्रवेश केला होता. स्पर्धेत आठवे सीडींग मिळालेल्या किदाम्बी श्रीकांतला वर्ल्ड चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसने 21-17,21-17 असे पराभूत केले.
चोप्रा-सिक्की उपांत्यफेरीत
प्रणव चोप्रा आणि सिक्की रेड्डीने मिश्र दुहेरीत कीम हा आणि सीउंग यांचा 21-18,9-21, 21-19 असा पराभव करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला.
गुरुवारी स्थानिक खेळाडू आणि जेतेपदाची प्रबळ दावेदार, विश्व चॅम्पियन ओकुहाराविरुद्ध तिस-यांदा खेळणा-या सिंधूला सर्वोत्कृष्ट खेळ करता आला नाही. अनेक चुकांचा फटका बसताच सिंधूचा ४७ मिनिटांत एकतर्फी लढतीत १८-२१, ८-२१ ने पराभव झाला. या दोघींमध्ये मागचा सामना ११० मिनिटे रंगला होता. त्या सामन्यातील संघर्ष आज दिसलाच नाही. त्याआधी कोरिया ओपनमध्ये सिंधूने ८३ मिनिटांचा थरार जिंकताना ओकुहाराचा पराभव करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.
लंडन ऑलिम्पिकची कांस्य विजेती सायना पाचवी मानांकित आणि ऑलिम्पिक चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिनविरुद्ध सुरुवातीला १४-१० आणि दुसºया गेममध्ये ६-४ अशा आघाडीनंतर १६-२१, १३-२१ अशा फरकाने पराभूत झाली.