किदाम्बी श्रीकांत उप-उपांत्यपूर्व फेरीत; प्रणॉयचे आव्हान संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 04:44 AM2018-11-08T04:44:15+5:302018-11-08T04:45:03+5:30
भारताचा आघाडीचा शटलर किदाम्बी श्रीकांत याने सहज विजयासह आगेकूच करताना, चायना ओपन विश्व टूर सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
फुझोउ - भारताचा आघाडीचा शटलर किदाम्बी श्रीकांत याने सहज विजयासह आगेकूच करताना, चायना ओपन विश्व टूर सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी, अन्य लढतीत एच. एस. प्रणॉय याला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला.
पाचव्या मानांकित श्रीकांतने फ्रान्सच्या लुकास कोरवी याचा सरळ दोन गेममध्ये २१-१२, २१-१६ असा सहज पराभव करत दिमाखात आगेकूच केली. पुढील फेरीत श्रीकांतचा सामना इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्तो याच्याविरुद्ध होईल. दुसरीकडे, प्रणॉयला आशियाई स्पर्धेचा सुवर्ण पदकविजेत्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीविरुद्ध ११-२१, १४-२१ असा पराभव झाला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात प्रणॉयला पुनरागमन करण्याची एकही संधी मिळाली नाही.
अन्य एका लढतीत भारताची युवा शटलर वैष्णवी रेड्डी जाक्का हिला थायलंडच्या पोर्नापावी चोचुवोंग हिच्याविरुद्ध १२-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. या आधीच आॅलिम्पिक रौप्य पदक विजेती पी. व्ही. सिंधूने उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. (वृत्तसंस्था)
मिश्र गटात निराशा
मिश्र दुहेरी गटामध्ये भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी - अश्विनी पोनप्पा यांना पराभवाचा धक्का बसला.
सातव्या मानांकित मलेशियाच्या चान पेंग सून - गोह लियू यिंग यांनी सात्विक - अश्विनी यांचा १८-२१, २१-१९, २१-१७ असा पराभव केला.
पहिला गेम जिंकून शानदार सुरुवात केल्यानंतर सात्विक - अश्विनी यांना आपल्या खेळामध्ये सातत्य ठेवण्यात यश आले नाही.