कोरिया ओपन; सिंधू, प्रणॉयवर भारताची मदार, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत यांची अनुपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 01:21 AM2017-09-12T01:21:40+5:302017-09-12T01:22:14+5:30
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागलेल्या स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिच्यावर मंगळवारपासून सुरु होत असलेल्या कोरिया सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार असेल. सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये सिंधू भारतीय संघाचे नेतृत्व करेल.
सोल : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागलेल्या स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिच्यावर मंगळवारपासून सुरु होत असलेल्या कोरिया सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार असेल. सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये सिंधू भारतीय संघाचे नेतृत्व करेल. पुढील महिन्यात होत असलेल्या जपान ओपन स्पर्धेच्या तयारीसाठी श्रीकांतने कोरिया स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
येथील एसके हँडबॉल स्टेडियममध्ये होत असलेल्या या स्पर्धेत हाँगकाँगच्या च्युंग एनगानविरुद्ध पहिला सामना खेळून सिंधू विजेतेपदाच्या मोहिमेला सुरुवात करेल. पुरुष एकेरीत श्रीकांतच्या अनुपस्थितीमध्ये एच. एच. प्रणॉय आणि बी. साई प्रणीत यांच्यावर भारताची मुख्य मदार असेल. पहिल्या फेरीत प्रणॉय हाँगकाँगच्या सहाव्या मानांकीत एनजी लाँग एंगस याच्याविरुद्ध भिडेल. तसेच, प्रणीत सलामीला हाँगकाँगच्याच ह्यू यूनविरुद्ध खेळेल. त्याचप्रमाणे, सय्यद मोदी ग्रां. प्री. विजेता समीर वर्मा पुरुष एकेरीमध्ये थायलंडच्या तेनोंगसाक सेनसोमबूनसुकविरुध्द लढेल. तसेच, त्याचा मोठा भाऊ सौरभ वर्मा पात्रता फेरीपासून सुरुवात करेल.
मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा - एन. सिक्की रेड्डी यांच्यापुढे पहिल्या फेरीत प्रवीण जॉर्डन - डेबी सुसांतो या इंडोनेशियन जोडीचे आव्हान असेल. तसेच, पुरुष दुहेरीमध्ये मनु अत्री - बी. सुमीत रेड्डी पात्रता फेरीतून आगेकूच करणाºया जोडीविरुद्ध खेळतील. मंगळवारी पात्रता फेरीतील पुरुष दुहेरी गटात सात्विकसाइराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी ही भारतीय जोडी जोंग वू चोई - हुई तेई किम या कोरियन जोडीविरुध्द लढेल. (वृत्तसंस्था)
राष्ट्रीय स्पर्धेत प्रमुख शटलर्स खेळणार
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत दरवर्षी राहणारी प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती चर्चेचा आणि टीकेचा विषय राहत होता. परंतु, यंदा नोव्हेंबर महिन्यात नागपूरमध्ये होत असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांच्यासह सर्व प्रमुख खेळाडू खेळणार असल्याची माहिती भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बाइ) मिळाली.
एंगसच्या खेळामध्ये बचाव आणि आक्रमणाचे चांगले मिश्रण आहे. कधी कधी तो अनपेक्षित फटके खेळून आश्चर्याचे धक्के देतो. त्यामुळे मला कोर्टवर चांगला खेळ करावा लागेल. कोरियामध्ये परिस्थिती कशाप्रकारे असतील याची उत्सुकता आहे. - एच. एस. प्रणॉय