कोरिया ओपन बॅडमिंटन स्पधा : कश्यप उपांत्य फेरीत पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 04:08 AM2019-09-29T04:08:59+5:302019-09-29T04:09:25+5:30
भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याची कोरिया ओपन सुपर ५०० स्पर्धेची विजयी घोदौड शनिवारी खंडित झाली.
इंचियोन : भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याची कोरिया ओपन सुपर ५०० स्पर्धेची विजयी घोदौड शनिवारी खंडित झाली. शनिवारी येथे पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत त्याला जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित जपानच्या केंटो मोमोटा याच्याकडून पराभव पत्करावा लागला.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावरील कश्यपच्या रूपाने भारताचे एकमेव आव्हान या स्पर्धेत जिवंत होते. त्याला ४० मिनिटांच्या लढतीत विद्यमान विश्वविजेता मोमोटा याच्याकडून १३-२१, १५-२१ असे पराभवाचे तोंड पाहावे लागले.
कश्यपजवळ मोमोटा याच्या वेगवान फटक्याला तोड नव्हती. पहिल्या गेममध्ये भारतीय खेळाडूने एक चांगला रिटर्न आणि पुन्हा स्मॅश मारत २ गुण घेतले; परंतु जपानच्या खेळाडूने प्रदीर्घ रॅलीच्या ब्रेकपर्यंत ४-० अशी आघाडी घेतली होती.मोमोटा याने आघाडी २०-१३ अशी केली. कश्यपने पुन्हा बाहेर फटका मारला आणि मोमोटा याने पहिला गेम आपल्या नावावर केला.
दुसऱ्या गेममध्ये रॅली तेजतर्रार झाली कश्यपने दबाव वाढवण्यास सुरुवात करीत सलग पाच गुण घेतले; परंतु जपानचा खेळाडू ब्रेकपर्यंत ११-७ ने आघाडीवर राहिला. कश्यपने १२-१२ अशी बरोबरी साधली; परंतु मोमोटाने क्रॉसकोर्ट स्मॅशने ६ गुण घेतले. (वृत्तसंस्था)