कोरिया ओपन: कश्यपने झुंजार विजयासह गाठली उपांत्यपूर्व फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 01:50 AM2019-09-27T01:50:10+5:302019-09-27T06:55:18+5:30
एकेरीत मलेशियाच्या डेरेन लियूवर मात
इंचियोन : भारताचा स्टार खेळाडू पारुपल्ली कश्यप याने गुरुवारी मलेशियाच्या डेरेन लियू याच्यावर तीन गेममधील सामन्यात मात करीत कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण विजेता कश्यपने ५६ मिनिटांच्या खेळात डेरेन लियूवर २१-१७, ११—२१,२१-१२ ने विजय साजरा केला.
हैदराबादच्या ३३ वर्षांच्या कश्यपचा पुढील सामना डेन्मार्कचा जॉन ओ जोर्गेन्सन याच्याविरुद्ध होईल. पाच वर्षांआधी डेन्मार्क ओपनमध्ये उभय खेळाडूंमध्ये लढत झाली होती. कश्यपचा २०१५ चा विश्व चॅम्पियन जोर्गेन्सन विरुद्धचा रेकॉर्ड २-४ असा आहे. डेन्मार्कचा ३१ वर्षांच्या जोर्गेन्सनने इंडोनेशियाचा अँथोनी सिनिसुका जिंटिंग याला ५८ मिनिटात १७-२१, २१-१६, २१-१३ ने पराभूत केले. जोर्गेन्सनविरुद्ध खेळण्याआधी कश्यप म्हणाला, ‘हा चांगला सामना होईल. जिनटिंगला नमविल्याने जोर्गेन्सन फॉर्ममध्ये आहे. हा सामना कठीण असेल.’ या स्पर्धेत आघाडीचे सर्व खेळाडू पराभूत झाल्यानंतर भारताचे आव्हान सादर करणारा कश्यप एकमेव खेळाडू आहे. विश्वविजेती सिंधू पहिल्या फेरीत पराभूत झाली. सायना नेहवालला पोटाच्या विकारामुळे अर्ध्यावर माघार घ्यावी लागली. विश्व स्पर्धेचा कांस्य विजेता बी. साईप्रणीत हाही सलामीच्या लढतीतून दुखापतीमुळे निवृत्त झाला होता. (वृत्तसंस्था)
दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला माझा खेळ बहरला. पण लियूने झुंजवले. त्याने आघाडीही मिळवली. ही आघाडी वाढत गेल्याने बरोबरी साधणे कठीण झाले. तिसºया गेममध्ये वेगवान फटके मारत आघाडी घेतली. लियूवर वर्चस्व राखल्यानेच विजय मिळाला. - पी. कश्यप