लक्ष्य सेन, वैष्णवी रेड्डी यांच्याकडे ज्युनिअर भारतीय संघाचे नेतृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 02:57 AM2018-10-07T02:57:43+5:302018-10-07T02:57:55+5:30
सध्याचा ज्युनियर आशियाई विजेता लक्ष्य सेन हा कॅनडातील मारखम येथे ५ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.
नवी दिल्ली : सध्याचा ज्युनियर आशियाई विजेता लक्ष्य सेन हा कॅनडातील मारखम येथे ५ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. मुलींचे नेतृत्व वैष्णवी रेड्डी करेल. भारतीय पथकात १३ मुले आणि ११ मुलींचा समावेश आहे.
भारतीय बॅडमिंटन संघटनेने विश्व स्पर्धेसाठी निवडलेल्या संघासाठी अनिवार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून, पंचकुला येथे १६ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान शिबिर चालेल.
विश्व चॅम्पियनसाठी खेळाडूंची निवड अ.भा. रँकिंग निवड स्पर्धेच्या आधारे केली जाते. त्यात सप्टेंबर महिन्यात चंदीगड येथे झालेल्या योनेक्स सनराईज बॅडमिंटन स्पर्धा आणि पंचकुला येथे झालेल्या कृष्णा खेतान स्मृती स्पर्धेचा समावेश होता.
निवड समितीने या दोन्ही स्पर्धांमध्ये मिळविलेल्या गुणांच्या आधारे खेळाडू निवडले. मुलांमध्ये केरळचा किरण जॉर्ज आणि मध्य प्रदेशचा आलाप मिश्रा यांनी सारख्या ७०० गुणांची कमाई केली. पण या दोघांत झालेल्या लढतीत किरणने बाजी मारली होती. महिला एकेरीत महाराष्टÑाची (नागपूर) मालविका बन्सोड विजेती राहिली. तिने सर्वाधिक एक हजार गुणांची कमाई केली. मालविकाची संघात दुसºयांदा निवड झाली आहे. (वृत्तसंस्था)