सिंधूकडे नेतृत्वाचा भार, हाँगकाँग सुपर सिरीज, आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:19 AM2017-11-21T03:19:53+5:302017-11-21T03:22:25+5:30
गेल्या एक महिन्यापासून सलग पाच स्पर्धा खेळणारी आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू हिच्याकडे हॉँगकॉँग सुपर सिरीज स्पर्धेचे नेतृत्व असेल.
कोवलून (हॉँगकॉँग) : गेल्या एक महिन्यापासून सलग पाच स्पर्धा खेळणारी आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू हिच्याकडे हॉँगकॉँग सुपर सिरीज स्पर्धेचे नेतृत्व असेल. ४० हजार डॉलर रकमेच्या या स्पर्धेसाठी जेव्हा ती कोर्टवर उतरेल तेव्हा तिला थोडा थकव्याचाही सामना करावा लागेल. कारण ती सतत खेळत आली आहे. सलग खेळत असल्यामुळे तिची हालचालही थोडी संथ झाली आहे. शॉट्समध्येही आक्रमकता दिसत नाही. त्यामुळे तिला शारीरिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.गेल्या आठवड्यात चीन ओपन सुपर सिरीज प्रीमिअर स्पर्धेत चीनच्या युवा खेळाडूकडून सिंधू पराभूत झाली होती.
भारतीय खेळाडूंना या पराभवातून लवकरच बाहेर यावे लागेल. पहिल्याच फेरीत त्यांना सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन करावे लागेल. पहिल्या फेरीत विजय मिळविल्यानंतर सिंधू सरळ उपांत्यपूर्व फेरी गाठेल आणि तिचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्याविरुद्ध होईल. ही खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून तिने गेल्याच आठवड्यात चीन ओपनचा किताब पटकाविला होता. त्यामुळे सिंधूचा प्रवास खडतर असेल.
इतर भारतीयांमध्ये राष्ट्रीय विजेती सायना नेहवाल आणि एचएस प्रणयसुद्धा सिंधूप्रमाणेच सलग खेळत आहेत. प्रणय याला पहिल्या फेरीत हॉँगकॉँगचा अनुभवी हू युन याच्याविरुद्ध खेळावे लागणार आहे, तर सायनाचा सामना डेन्मार्कच्या मेट पालसनेविरुद्ध होईल.