मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 03:52 AM2020-01-10T03:52:12+5:302020-01-10T07:03:42+5:30
विश्वविजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी शानदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
क्वालालम्पूर : विश्वविजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी शानदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सहाव्या मानांकित सिंधूने जपानची अया ओहोरी हिच्यावर केवळ ३४ मिनिटात २१-१०, २१-१५ अशा फरकाने मात केली. सिंधूचा ओहोरीवर हा सलग नववा विजय होता. मागच्या वर्षी बासेल येथे विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या २४ वर्षांच्या सिंधूला आता उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली चायनीज तैपईची ताय ज्युंग आणि द. कोरियाची सिंग हून यांच्यात होणाºया लढतीतील विजेत्या खेळाडूंविरुद्ध झुंज द्यावी लागेल.
सायनाने द. कोरियाची आन सेयंगविरुद्ध रोमहर्षक झालेली लढत ३९ मिनिटांत २५-२३, २१-१२ अशी जिंकली. द. कोरियाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर सायनाचा हा पहिलाच विजय होता. मागच्या वर्षी फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व सामन्यात सायना सेयंगकडून पराभूत झाली होती. सायनाची उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडेल ती आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिनविरुद्ध.
दुसरीकडे, पुरुष एकेरीत समीर वर्मा दुसºया फेरीत पराभूत झाला. त्याला मलेशियाचा ली जिया याच्याकडून १९-२१, २०-२२ असा पराभवाचा फटका बसला. (वृत्तसंस्था )