मुंबईकर मानसी पदक मिळवण्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 03:29 AM2018-08-10T03:29:18+5:302018-08-10T03:29:43+5:30

कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता अखेरपर्यंत आपले लक्ष्य साध्य करण्याची जिद्द प्रत्येक खेळाडूमध्ये दिसून येते.

Mumbaikar is ready to get Manasi medal | मुंबईकर मानसी पदक मिळवण्यासाठी सज्ज

मुंबईकर मानसी पदक मिळवण्यासाठी सज्ज

googlenewsNext

मुंबई : कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता अखेरपर्यंत आपले लक्ष्य साध्य करण्याची जिद्द प्रत्येक खेळाडूमध्ये दिसून येते. भले यश मिळो अथवा नको, पण शेवटपर्यंत लढत राहण्याचा निश्चय पत्येक खेळाडूमध्ये पाहायला मिळतो. अशीच जिद्द मुंबईकर बॅडमिंटनपटू मानसी जोशीमध्ये दिसून येत आहे. अपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतरही न डगमगता ती आगामी पॅरा आशियाई स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावण्यास सज्ज झाली आहे.
एका भीषण रस्ता अपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतर २९ वर्षीय मानसीचा आत्मविश्वास जराही कमी झाला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न तिने कधीही सोडले नाही आणि आता तिने बॅडमिंटन गुरु पुलेल्ला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ला आगामी पॅरा आशियाई स्पर्धेसाठी सज्ज केले आहे. मुळची मुंबईची असलेली मानसी गेल्या एक महिन्यापासून गोपीचंद अकादमीमध्ये सराव करीत असून जकार्तामध्ये आॅक्टोबर महिन्यात होत असलेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत ती सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.
डिसेंबर २०११ साली झालेल्या एका भीषण रस्ता अपघातामध्ये मानसीने आपला एक पाय गमावला. यानंतर ती पुन्हा कोर्टवर उतरेल की नाही अशी शंका होती. मात्र, मानसीही हार न मानता मोठ्या जिद्दिने पुनरागमन केले आहे. तिने आपल्या खेळावर कोणताही परिणाम होऊ न देता सराव कायम राखला. मानसी म्हणाली की, ‘मी लहानपणापासून बॅडमिंटन खेळते. अपघात झाल्यानंतरही मी हार मानली नाही आणि माझ खेळ सुरु ठेवला.’ दखल घेण्याची बाब म्हणजे कृत्रिम पायाच्या सहाय्याने खेळत असलेल्या मानसीने अनेक स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व केलेल्या मानसीने अनेक पदकांची कमाईही केली आहे.
मानसीने पुढे म्हटले की, ‘मुंबईत रिहॅबिलिटेशन क्लिनिकमध्ये सर्वप्रथम कृत्रिम पाय लावला. ज्या कृत्रिम पायाचा मी वापर करते त्यात सेंसर लावण्यात आहेत.’ मानसीची कठोर मेहनत पाहून प्रशिक्षक गोपीचंदही प्रभावित झाले. ती सर्वच लोकांसाठी एक प्रेरणास्थान असल्याचे वक्तव्य गोपीचंद यांनी केले आहे. गोपीचंद म्हणाले की, ‘पॅरा बॅडमिंटनमध्ये पदक जिंकण्यासाठी अनेक संधी असतात. ती अत्यंत महेनती आहे. तीचा झुंजार खेळ पाहून खूप चांगले वाटते. अनेक सक्षम लोकांसाठी ती प्रेरणास्थान आहे. ती स्पर्धेत नक्कीच यशस्वी कामगिरी करेल.’
>सरकारकडून अपेक्षा
मानसीला कृत्रिम पायाच्या खर्चाचे ओझे वाहून खेळावे लागत आहे. तिने सांगितले की, ‘मी जो कृत्रिम पाय वापरते तो खूप महाग आहे. मला आशा आहे की, यामध्ये मला सरकारकडून काहीप्रमाणात सूट मिळेल. कृत्रिम अवयवांमध्ये नुकताच ५ टक्के जीएसटी जोडण्यात आला आहे. कृत्रिम पायाची किंमत २० लाख रुपये असून दर पाच वर्षांनी हा पाय बदलावा लागतो. त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या कितीही सक्षम असाल, तरी हे एक ओझेच आहे.’

Web Title: Mumbaikar is ready to get Manasi medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.