भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू श्रीकांतला धक्का देत प्रणॉय बनला नॅशनल चॅम्पियन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 05:49 PM2017-11-08T17:49:29+5:302017-11-08T20:09:10+5:30
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या किदम्बी श्रीकांतला धक्का देत युवा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.
नागपूर - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या किदम्बी श्रीकांतला धक्का देत युवा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत प्रणॉयने अटीतटीच्या लढतीत श्रीकांतवर 21-15, 16-21, 21-7 अशी मात केली.
देशाचा अव्वल बॅडमिंटनपटू श्रीकांत आणि धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता बाळगणारा प्रणॉय यांच्यातील लढत चुरशीची होईल अशी अशी अपेक्षा होती आणि अपेक्षेप्रमाणे ही लढत अटीतटीची झाली. प्रणॉयने अंतिम लढतीत सनसनाटी सुरुवात करत पहिला गेम 21-15 अशा फरकाने जिंकला. मात्र अनुभवी श्रीकांतने सामन्यात पुनरागमन करताना दुसऱ्या गेममध्ये 21-16 ने बाजी मारली.
दोन गेमनंतर लढत 1-1 अशा बरोबरीत असल्याने तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये चुरस अधिकच वाढली. मात्र आजचा दिवस प्रणॉयचा होता. त्याने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत तिसऱ्या गेममध्ये श्रीकांतचा 21-7 अशा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. त्याबरोबरच प्रणॉयने या लढतीत 21-15, 16-21, 21-7 अशी बाजी मारत विजेतेपदावर कब्जा केला. विजयानंतर चाहत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात प्रणयचे अभिनंदन केले. प्रणयने देखील अभिवादन करीत स्वत:चे रॅकेट प्रेक्षकागॅलरीत भिरकावले. नीरज अग्रवाल नावाच्या प्रेक्षकास हे अनपेक्षित गिफ्ट मिळाले.
#FLASH: HS Prannoy beats Kidambi Srikanth 21-15, 16-21, 21-7 in #BadmintonNationals final to win the men's singles title. pic.twitter.com/lmBMMXFCaG
— ANI (@ANI) November 8, 2017
तत्पूर्वी काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात प्रणॉयने महाराष्ट्राचा खेळाडू शुभांकर डे याचा २१-१४, २१-१७ ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुस-या उपांत्य सामन्यात अनुभवी श्रीकांतने उत्तराखंडच्या लक्ष्य सेन याची झुंज मोडून काढत २१-१६, २१-१८ने बाजी मारली होती.
पहिले जेतेपद अभिमानास्पद
पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळविणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मी वयाच्या १३ व्या वर्षांपासून खेळत आहे पण राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद
प्रथमच मिळाले. हा विजय माझ्यासाठी सर्वकाही आहे. श्रीकांतविरुद्ध विशेष डावपेच आखले नव्हते. रोजच एकमेकांविरुद्ध खेळत असल्याने आम्हाला परस्परांचा गेम माहिती आहे. माझे लक्ष्य प्रत्येक गुणावर होते. प्रत्येक सामन्यागणिक आत्मविश्वास उंचावत जातो.ह्णह्ण
- एच. एस. प्रणय, पुरुष एकेरीचा राष्ट्रीय विजेता