नागपूरात आजपासून राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धा; ४०० सामने, ४५० दिग्गज खेळाडूंचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 02:31 AM2017-11-02T02:31:42+5:302017-11-02T02:31:45+5:30
स्टार किदाम्बी श्रीकांत, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, आश्विनी पोनप्पा, एच. एस. प्रणॉय, अजय जयराम या दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या ८२व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन गुरुवारपासून कोराडी रोडवरील विभागीय क्रीडासंकुलात होत आहे.
नागपूर : स्टार किदाम्बी श्रीकांत, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, आश्विनी पोनप्पा, एच. एस. प्रणॉय, अजय जयराम या दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या ८२व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन गुरुवारपासून कोराडी रोडवरील विभागीय क्रीडासंकुलात होत आहे.
सांघिक, तसेच वैयक्तिक प्रकारात होणाºया या स्पर्धेत आठ कोर्टवर ४०० सामने खेळविले जातील. २९ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांतील ४५० खेळाडू सात दिवस जेतेपदासाठी झुंज देतील. विजेत्यांना एकूण ६० लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येतील. महाराष्टÑात २० वर्षांनंतर आणि नागपुरात पहिल्यांदा स्पर्धेचे आयोजन होत असल्याची माहिती महाराष्टÑ बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सर्व दिग्गज खेळाडू उपउपांत्यपूर्व फेरीपासून हजेरी लावणार असून ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान त्यांचे सामने होतील. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून होणार आहे. आकाशवाणीवरून सामन्यांचे समालोचनदेखील होईल. आज सकाळी ८.३० वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन होणार असून त्यानंतर सांघिक गटाचे सामने सुरू होतील. सांघिक गटात पाटणा येथे झालेल्या गतस्पर्धेचा विजेता पेट्रोलियम क्रीडा मंडळ (पीएससीबी), उपविजेता एअरपोर्ट अॅथॉरिटी (एएआय) यांच्याशिवाय आंध्र प्रदेश, हरियाना, महाराष्टÑ, मणिपूर, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश संघ खेळणार आहेत.
शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वैयक्तिक स्पर्धेचे उद्घाटन आणि सांघिक गटाचे पुरस्कार वितरण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एकेरीचा अंतिम सामना खेळविला जाणार असून विजेत्यांना पुरस्कृत करण्यात येईल. या वेळी महाराष्टÑाचे माजी खेळाडू प्रदीप गंधे आणि सी. डी. देवरस यांचा सत्कार करण्यात येईल, असे लखानी यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला बीएआयचे सचिव पुनय्या चौधरी, ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रदीप गंधे, उपाध्यक्ष मुरलीधरन, महाराष्टÑ संघटनेचे सचिव सुंदर शेट्टी, कोषाध्यक्ष कुलिन माणेक, आंतरराष्टÑीय रेफ्री गिरीश नातू, स्पर्धेचे रेफ्री मोहम्मद अली, जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा कुंदाताई विजयकर आणि सचिव मंगेश काशीकर उपस्थित होते.
सायना-सिंधू आकर्षण
आॅलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू आणि कांस्यविजेती सायना नेहवाल स्पर्धेदरम्यान एकमेकींविरुद्ध खेळण्याची शक्यता असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. याशिवाय एकाच वर्षात चार सुपर सीरिज जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू किदाम्बी श्रीकांत याचा खेळ पाहण्यास बॅडमिंटन चाहते उत्सुक आहेत.
(उपउपांत्यपूर्व फेरी)
पुरुष : किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी. साईप्रणीत, समीर वर्मा, अजय जयराम, सौरभ वर्मा, पारुपल्ली कश्यप, डॅनियल फरीद.
महिला : पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, रितुपर्णा दास आणि अनुरा प्रभुदेसाई.
पुरुष दुहेरी : सात्त्विक साईराज जंकीरेड्डी - चिराग शेट्टी, मनू अत्री-बी. सुमीत रेड्डी, एम. आर. अर्जुन-श्लोक रामचंद्रन.
महिला दुहेरी : आश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी, संजना संतोष-आरती सारा सुनील, जे. मेघना-एस. रामपूर्विशा.
मिश्र दुहेरी : प्रणय जेरी चोप्रा-एन. सिक्की रेड्डी, बी. सुमीत रेड्डी-आश्विनी पोनप्पा.
पुरस्कार...
महिला व पुरुष एकेरी : (उपउपांत्यपूर्व फेरी) ५० हजार, उपांत्यपूर्व फेरी ७५ हजार, उपांत्य एक लाख, उपविजेता एक लाख ५० हजार. विजेता २ लाख. पुरुष व महिला दुहेरी : उपांत्यपूर्व फेरी ७५ हजार, उपांत्य १ लाख, उपविजेता १.५० लाख, विजेता २ लाख रुपये.
सांघिक : उपांत्य एक लाख, उपविजेता तीन लाख आणि विजेता पाच लाख रुपये.