प्रशिक्षकांसाठी शिबिर आयोजिण्याची गरज - प्रकाश पदुकोण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:45 AM2017-11-29T01:45:53+5:302017-11-29T01:46:22+5:30
भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे. आज भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर खूप मोठी मजल मारत आहेत. पण असे असले, तरी सध्या भारताला मोठ्या प्रमाणात गुणवान प्रशिक्षक घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
मुंबई : भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे. आज भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर खूप मोठी मजल मारत आहेत. पण असे असले, तरी सध्या भारताला मोठ्या प्रमाणात गुणवान प्रशिक्षक घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपल्याकडे सध्या उच्च दर्जाच्या प्रशिक्षकांची संख्या कमी असून, असे प्रशिक्षक घडविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे,’ असे स्पष्ट
मत भारताचे माजी दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले.
मुंबईतील क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे मंगळवारी पदुकोण यांच्या वतीने इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेची घोषणा करण्यात आली. या वेळी प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजिण्याचे आवश्यक असल्याचे सांगताना पदुकोण म्हणाले, ‘‘आज आपल्याकडे खूप कमी प्रशिक्षित किंवा उच्च दर्जाचे प्रशिक्षक आहेत. यासाठी आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, परंतु राष्ट्रीय संघटनेच्या वतीने यावर काम सुरू आहे. तसेच, आपल्याकडे खूप चांगले प्रशिक्षक आहेत, पण त्यांना आवश्यक संधी मिळत नसल्याने त्यांचे नुकसान भारतीय बॅडमिंटनला होत आहे. मात्र, भविष्यामध्ये हे चित्र नक्कीच बदलेल, याची मला खात्री आहे.’’
खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा विचार करता नुकताच किदाम्बी श्रीकांतने घेतलेला निर्णय खूप अचूक होता. त्याने आगामी दुबई स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी इतर सुपर सिरीज स्पर्धेतून माघार घेत अतिरिक्त सामने खेळण्यापासून स्वत:ला दूर ठेवले. तो दुबई स्पर्धेत जिंकेल की नाही, हे मी सांगू शकत नाही; पण एक मात्र नक्की, की या स्पर्धेत पूर्णपणे सज्ज होण्यासाठी त्याने पुरेसा वेळ मिळवला. शिवाय महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्यानंतर तुम्ही आपोआप अव्वल स्थानी पोहोचता. त्यामुळे खेळाडूंनी महत्त्वाच्या स्पर्धेत केवळ सहभागी न होता त्या स्पर्धा जिंकाव्यात. - प्रकाश पदुकोण