न्यूझीलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन : प्रणय, कश्यप विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:17 AM2017-08-02T01:17:37+5:302017-08-02T01:17:42+5:30
यूएस ओपन विजेता एच.एस. प्रणय आणि राष्ट्रकुल चॅम्पियन पारुपल्ली कश्यप यांनी न्यूझीलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत दुस-या फेरीत प्रवेश
आॅकलंड : यूएस ओपन विजेता एच.एस. प्रणय आणि राष्ट्रकुल चॅम्पियन पारुपल्ली कश्यप यांनी न्यूझीलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत दुस-या फेरीत प्रवेश केला, तर विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवणारा अजय जयराम याला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.
चौथ्या मानांकि त प्रणयने इंडोनेशियाच्या शेसार हिसेर रुस्टाविटोचा २१-१४, २१-१६ ने पराभव केला. १५ व्या मानांकित कश्यपने इंडोनेशियाच्या डी हेओम रुम्बाकावर २१-५, २१-१० ने सहज सरशी साधली. प्रणयला आता इंडोनेशियाच्या फिरमान अब्दुल खोलिकविरुद्ध खेळावे लागणार आहे, तर कश्यपची लढत स्थानिक खेळाडू आॅक्सर गुओविरुद्ध होईल. युवा बॅडमिंटनपटू सिरिल वर्मा, प्रतुल जोशी, सौरभ वर्मा, नीरज वशिष्ठ व साहिल सिपानी यांनीही विजयी सुरुवात केली. सातव्या मानांकित सौरभने आॅस्ट्रेलियाच्या नाथन तांगचा २१-१७ , २१-१५ ने पराभव केला. सिरिलने इंडोनेशियाच्या रियांतो सुबाजाविरुद्ध २१-१३, २१-१२ ने विजय मिळवला.
प्रतुलने स्थानिक खेळाडू डॅक्सोन वोंगचा २१-१०, २१-१३ ने पराभव केला. नीरजने इंडोनेशियाच्या अॅण्ड्य्रू युनांतोचा २१-८, २१-९ ने, तर साहिलने न्यूझीलंडच्या जोशुआ फेंगचा २१-१०, २१-१० ने पराभव केला.
जयरामला चिनी ताइपेच्या चिया हुंग लूविरुद्ध २१-१९, २१-१३ ने पराभव स्वीकारावा लागला. प्रतुलला यानंतर अव्वल मानांकित चिनी ताइपेच्या झू वेइ वांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, तर नीरजची लढत आॅस्ट्रेलियाच्या अँथोनी जोविरुद्ध होईल. सौरभला इंडोनेशियाच्या हेनरिको खो विबोवाविरुद्ध तर साहिलला ११ व्या मानांकित चिनी ताइपेच्या लिन यू सियेनविरुद्ध खेळावे लागले. सिरिलची गाठ इंडोनेशियाच्या सपुत्रा विकी एंगाबरोबर पडणार आहे.
भारताचे सिद्धार्थ ठाकूर, सचिन रावत, अरुण कुमार व अशोक कुमार यांचे आव्हान संपुष्टात आले. महिला एकेरीमध्ये संयोगिता घोरपडेला न्यूझीलंडच्या शी योंगशीविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. (वृत्तसंस्था)