न्यूझीलंड ओपन भारताचे आव्हान संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:04 AM2017-08-05T01:04:31+5:302017-08-05T01:04:33+5:30
एच. एस. प्रणय आणि सौरभ वर्मा एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होताच न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. चौथा मानांकित प्रणय हा चायनिज तायपेईचा ११ वा मानांकित लिन यून सियेन याच्याकडून पराभूत झाला तर सौरभला हाँगकाँगचा ली चियुक यिऊ याने नमविले.
आॅकलंड : एच. एस. प्रणय आणि सौरभ वर्मा एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होताच न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले.
चौथा मानांकित प्रणय हा चायनिज तायपेईचा ११ वा मानांकित लिन यून सियेन याच्याकडून पराभूत झाला तर सौरभला हाँगकाँगचा ली चियुक यिऊ याने नमविले. मागच्या महिन्यात यूएस ओपन बॅडमिंटनचे जेतेपद पटकविणारा प्रणय एक तास सहा मिनिटे चाललेल्या लढतीत १०-२१, २२-२०, २१-२३ ने पराभूत झाला. माजी राष्टÑीय विजेता असलेला वर्मा केवळ ४२ मिनिटांत १९-२१, १६-२१ ने पराभूत होऊन बाहेर पडला.
प्रणय आणि सियेन यांच्यातील पहिला गेम चुरशीचा झाला. तायपेईच्या खेळाडूने ११-१० पासून आघाडी मिळविली. प्रणयला एकही गुण घेऊ न देता सियेनने २१-१० ने गेम जिंकला. प्रणयने दुसरा गेम १३-८ अशी आघाडी घेत नंतर २२-२० ने जिंकला व बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये मात्र सियेनने बाजी मारली.